लतादीदींचा जबरा फॅन, घरात उभारलं चक्क मंदिर अन् लग्नात...Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चाहत्यानं आपल्या घरातच लतादीदींचं मंदिर उभारलंय. तसेच रोज स्वरदेवता म्हणून त्यांची पूजा होतेय.
वर्धा, 26 सप्टेंबर: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आहे. लतादीदींचे देशभरात कोट्यावधी चाहते आहेत. मात्र वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा एक अवलिया फॅन आहे. राजीव देशमुख असं त्यांचं नाव असून अगदी बालपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांचं त्यांना वेड लागलंय. लतादीदींच्या निधनानंतर त्यांना स्वर देवतेचा दर्जा देत घरातच मंदिर उभारलं आणि त्याची रोज पूजाही केली जातेय.
देशमुख यांनी लतादीदीच्या निधनानंतर पहिल्या जयंतीला घरात मंदिर बनवलंय. त्यात दीदींची मूर्ती विराजमान असून हार, फुलं वाहून, उदबत्ती लावून पूजाही केली जाते. एवढंच नाही तर लतादीदींसाठी तयार केलेल्या एका गीताला स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून आरती प्रमाणे पूजना वेळी लावले जाते, असं देशमुख सांगतात.
लग्नपत्रिकेतही लावलाय लतादीदींचा फोटो
राजीव देशमुख यांना वयाच्या तेराव्या वर्षापासून लतादीदींच्या गाण्यांचा छंद लागला. लतादीदींच्या गाण्यांचं देशमुख यांना इतकं वेड आहे की त्यांच्या घराच्या भिंतीवर दीदींचे अनेक फोटो लावले आहेत. त्यांच्यासोबतच्या भेटीचा प्रसंग दर्शवणारा एक फोटो लावला आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत देखील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो लवायलाही ते विसरले नाहीत.
advertisement
एक किस्सा असाही
राजीव यांच्या आयुष्यातला एक किस्सा असा आहे की ते अवघ्या 7 व्या वर्गात असताना शाळेतूनच दीदींना मुबई येथे भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, आरपीएफ जवानांनी सातव्या वर्गातील देशमुख यांना एकटा बघून थेट घरी आणून सोडलं होतं. तरीही लतादीदींना भेटण्याची इच्छा काही कमी झाली नाही. पुन्हा 12 वीला असताना 1982 मध्ये एकटेच मुंबईत दीदींना भेटण्यासाठी गेले. तेव्हा दीदी या परदेशी गेल्या होत्या. त्यामुळे तेव्हाही भेट झाली नाही. त्यानंतर 1987 साली पुणे येथे एका कॉन्सर्ट मध्ये लता दीदींना भेटण्याची संधी मिळालीच. तेव्हा त्यांना जग जिंकल्यासारखं वाटलं. तो फोटोही देशमुख यांनी अगदी जपून ठेवलाय.
advertisement
सरस्वती देवीच्या रुपात रेखाटलं दीदींचं चित्र
राजीव देशमुख यांच्या पत्नी शुभांगी देखमुख यांनी लतादीदींचे सरस्वती देवीच्या रुपात पोस्टर तयार केले आहे. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल असे हे पोस्टर आहे. लता दीदी या आमच्यासाठी देवाप्रमाणे आहेत. तसेच तो आवाज पुन्हा होणे शक्य नाही. त्यामुळे स्वर देवतेचा आवाज असणाऱ्या लतादीदींना सरस्वती देवीच्या रूपात पोस्टरच्या माध्यमातून सादर केले आहे, असे शुभांगी सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 26, 2023 3:15 PM IST