अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत मोठा राडा,गद्दार म्हणत शिवसैनिकांना दाखवली चप्पल; वाद चिघळला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अंबरनाथ नगरपरिषदेच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
गणेश अनंत मंजुळा, प्रतिनिधी
ठाणे : एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. शिंदेसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्य 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान पहिल्यांदाच आमनेसामने आले. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात भाजपच्य कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. नगरपरिषदेच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
advertisement
नगरपरिषद सभागृहाबाहेर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप–प्रत्यारोप झाले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गद्दार, गद्दार अशा घोषणा दिल्या. संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना चपला दाखवत निषेध व्यक्त केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले. काही काळासाठी परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपवरून वाद
दरम्यान, अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू असतानाच भाजपने चार नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपवरून वाद निर्माण झाला आहे. या व्हीपबाबत गटनेत्यांकडून आक्षेप नोंदवण्यात येत असून, त्यावर शिवसेनेकडूनही सभागृहात भाजपला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
advertisement
भाजपला डिवचण्याचा प्रयत्न
निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शिवसैनिकांचा अतिउत्साहीपणा दिसून आला. अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाल्याचे बॅनर लावले होते. या बॅनरमुळे वादाला तोंड फुटले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून त्याखाली “बाप तो बाप रहेगा” असा मजकूर टाकण्यात आल्याने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
नगरपरिषदेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया वादग्रस्त
या सगळ्या प्रकारामुळे अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया वादग्रस्त ठरत असून, पुढील घडामोडींवर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
नेमकं काय झालं अंबरनाथमध्ये?
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणा शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का दिला होता. अंबरनाथमध्ये झालेल्या नगपालिका निवडणुकी एकनाथ शिंदेंची सेना, भाजप स्वबळावर लढले. शिंदेसेनेला सर्वाधिक 27, तर भाजपला 14 जागा मिळाल्या. पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भाजपनं शिंदेसेनेला धक्का दिला. शिवसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या. त्यासाठी 12 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला आणि 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यात आलं. भाजपनं सत्तेसाठी काँग्रेसशी युती केल्यानं देशभर चर्चा झाली .
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 3:12 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत मोठा राडा,गद्दार म्हणत शिवसैनिकांना दाखवली चप्पल; वाद चिघळला










