कल्याण-डोंबिवलीकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Last Updated:
Kalu Dam Project : कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाई संपवण्यासाठी काळू धरण प्रकल्पाला वेग देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. निधीची कमतरता भासू न देण्याची हमी देत त्यांनी प्रकल्प लवकर पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील रहिवाशांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाला आता कायमस्वरूपी उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता स्वतंत्र धरणाची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला प्रतिसाद
या कारणांसाठी काळू धरण हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी पूर्वी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएमार्फत जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नमूद केले. शनिवारी डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की काळू धरणाचे काम पुढे नेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काळू धरण उभारणी पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले की पाणीपुरवठ्यासाठी निधीची कधीही कमतरता भासू देणार नाही. नागरिकांना सतत आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे हे सरकारचे प्राधान्य असून कोणत्याही प्रकल्पाला आर्थिक तुटवडा आड येणार नाही अशी खात्री त्यांनी दिली.
या कार्यक्रमात देशातील पहिल्या व्हर्टिकल स्पोर्टस् संकल्पनेवर आधारित बहुमजली इनडोअर-आउटडोअर स्पोर्टस् इमारतीचे भूमिपूजन, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि प्रेरणा वॉर मेमोरियल या स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड, माजी महापौर विनिता राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, पद्मश्री गजानन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 2:32 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कल्याण-डोंबिवलीकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा


