Crime : 3 वर्षे पोलिसांना चकवा! घरं बदलत राहिले,अखेर गुन्हेगार भाऊ अखेर जाळ्यात; कल्याणमध्ये काय घडलं?
Last Updated:
Kalyan News : गंभीर मारहाण प्रकरणात जामिनावर सुटून तीन वर्षांपासून फरार असलेल्या कांबळे बंधूंना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर परिसरातून अटक केली.
कल्याण : गंभीर स्वरूपाच्या मारहाण प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना अखेर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. विनोद जगन्नाथ कांबळे आणि नागसेन उर्फ नागेश जगन्नाथ कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिवंडीतील काल्हेर परिसरातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
2016 मध्ये काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 साली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर मारहाण प्रकरणात कांबळे बंधूंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना जामीन मंजूर झाला.मात्र जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत ते न्यायालयात हजर राहिले नाहीत आणि जानेवारी 2023 पासून फरार झाले.
वारंवार समन्स बजावूनही आरोपी हजर न राहिल्याने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 17 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या अटकेसाठी जाहीरनामा काढला. तरीही हे दोघे तीन वर्षांहून अधिक काळ पोलिसांना चकवा देत होते. या काळात त्यांनी आपले राहण्याचे ठिकाण पाच ते सहा वेळा बदलले होते.
advertisement
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'त्या' फरार भावांना अटक
पण गुप्त बातमीदारामार्फत कांबळे बंधू सध्या भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिस शिपाई गोरक्ष शेकडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह पथकाने काल्हेरगाव येथे हल्दीराम गोदामाच्या मागे, सी.जी. पार्कजवळ सापळा रचला. योग्य नियोजन करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या पुढील चौकशी सुरू असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Crime : 3 वर्षे पोलिसांना चकवा! घरं बदलत राहिले,अखेर गुन्हेगार भाऊ अखेर जाळ्यात; कल्याणमध्ये काय घडलं?








