Dudhi Bhopla Recipe : दुधी भोपळा आहे कळणारच नाही; भाजी न खाणारेही खातील दुधीचं भगराळं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dudhi Bhopla Recipe Video : हा एक खान्देशी पदार्थ आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना हा माहिती असेल. पण इतरांसाठी हा पदार्थ नवीन आणि अनोखा आहे. त्यामुळे दुधी भोपळ्याचं भगराळं काय आहे, ते कसं बनवायचं पाहुयात.
दुधी भोपळा म्हटलं की अनेकांच्या डोक्यावर आट्या पडत असतील. दुधी भोपळ्याची शक्यतो अनेकांना आवडत नाही. त्यातल्या त्यात दुधी भोपळ्याचा हलवा आवडीने खात असतील. पण तरी हलवा खाऊन खाऊन किती खाणार किंवा तेच कितीदा बनवणार. आता आम्ही तुमच्यासाठी दुधी भोपळ्याची अशी भन्नाट रेसिपी आणली आहे की, दुधी भोपळा न आवडणारेही आवडीने खातील.
दुधी भोपळ्याचं भगराळं. दुधी भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याचा हलवा ऐकला आहे, पण दुधी भोपळ्याचं भगराळं, हे वाचून काहींना आश्चर्य वाटलं असेल. हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पडला असेल. खरंतर हा एक खान्देशी पदार्थ आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना हा माहिती असेल. पण इतरांसाठी हा पदार्थ नवीन आणि अनोखा आहे. त्यामुळे दुधी भोपळ्याचं भगराळं काय आहे, ते कसं बनवायचं पाहुयात.
advertisement
दुधी भोपळ्याचं भगराळं बनवण्यासाठी लागणारं साहित्य
1 कप दुधी भोपळ्याचा किस
1/2 कप बेसन
2-3 चमचे तेल
1 चमचा मोहरी
1 चमचा जिरं
चिमूटभर हिंग
1 चमचा आल्याचा किस
1 चमचा लसूण पेस्ट
advertisement
कढीपत्ता
1 चमचा लाल तिखट
1/2 चमचा हळद
1 चमचा धनेपूड
1 चमचा संडे मसाला
चवीनुसार मीठ
1 चमचा लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
दुधी भोपळ्याचं भगराळं कसं बनवायचं?
सगळ्यात आधी दुधी भोपळा घेताना तो कडू नाही हे थोडं कापून खाऊन तपासा. आता दुधी भोपळा सालीसकट किसून घ्या. नंतर गॅसवर पॅन घेऊन त्यात तेल घ्या. तेल तापलं की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरं घाला. आता चिमूटभर हिंग, किसलेलं आलं आणि लसणाची पेस्ट टाका. आलं-लसूण थोडा जास्तच टाका म्हणजे चव चांगली येते. कढीपत्त्याची पानं तोडून टाका. फोडणी झाली आहे.
advertisement
आता दुधी भोपळ्याचा किस घाला आणि नीट परतून घ्या. दुधी भोपळ्याचा रंग किंचित बदलेल. आता यात बेसन टाका. एक वाटी दुधी भोपळ्यासाठी अर्धा वाटी बेसन असं प्रमाण घ्या. नंतर लाल तिखट, हळद, काळा मसाला, धनेपूड टाका. आता नीट परतून घ्या. बेसन टाकल्याने ते पॅनला चिकटू शकतं त्यामुळे गॅस लहान करा किंवा शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा जाड बुडाचं भांडं वापरा. झाकण न ठेवता असं मधे मधे परतवूनच नीट शिजवून घ्या. वरून कोथिंबीर टाका.
advertisement
दुधी भोपळ्याचं भगराळं तयार. भगराळं म्हणजे मोकळं. त्यामुळे हा पदार्थ बनवताना तेलाचं प्रमाण जास्तच घ्या. जेणेकरून ते मोकळं होईल. भगराळं तयार झाल्यावर ते पाहताच असंच खाण्याचा मोह आवरणार नाही. पण तुम्ही हे भात, पोळी, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. असंचही तुम्ही हे खाऊ शकता.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 16, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dudhi Bhopla Recipe : दुधी भोपळा आहे कळणारच नाही; भाजी न खाणारेही खातील दुधीचं भगराळं


