Coronavirus JN.1 Variant - तुम्ही घेतलेली लस कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटवर प्रभावी आहे? WHO म्हणालं...
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
कोरोनाचा जेएन.1 हा नवा व्हेरिएंट जगासाठी काळजीचं कारण बनला आहे. कोरोनावर सध्या वापरात असलेल्या लशी नवीन व्हेरिएंटवर किती प्रभावी ठरतील हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : अडीच ते तीन वर्षांपूर्वी भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा जेएन.1 हा नवा व्हॅरिएंट जगासाठी काळजीचं कारण बनला आहे. कोरोनावर सध्या वापरात असलेल्या लशी नवीन व्हॅरिएंटवर किती प्रभावी ठरतील हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
काही महिन्यांनंतर देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2669 वर पोहोचली आहे. गेल्या एका आठवड्यापासून रोज सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जेएन.1 हा कोरोनाचा सब व्हॅरिएंट रुग्णसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचं दिसून आलं आहे. हा व्हॅरिएंट आल्यापासून यंत्रणांची चिंता वाढली आहे. सरकारचे एक्सपर्ट, मायक्रोबायोलॉजी विभागाची टीम आणि जीनोम सिक्वेन्सिंग करणाऱ्या प्रयोगशाळा या व्हॅरिएंटसंदर्भात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ ने जेएन.1 ला व्हॅरिएंट ऑफ इंटरेस्ट मानलं आहे; पण या व्हॅरिएंटपासून गंभीर धोका नाही, असं म्हटलं आहे; पण जगभरात या व्हॅरिएंटमुळे वाढत असलेली रुग्णसंख्या सामान्य नक्कीच नाही.
advertisement
सिंगापूरपासून अमेरिका आणि भारतात जेएन.1 व्हॅरिएंटचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रुग्णांमध्ये सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसत आहेत. कोविड व्हायरस सातत्याने त्याचं रूप बदलत आहे. जेएन.1 हे त्याचं एक रूप आहे. हा बीए.2.86 चा सब व्हॅरिएंट आहे, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लशीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत कोरोनावरच्या सध्याच्या लशी नव्या व्हॅरिएंटवर किती प्रभावी ठरतील असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
advertisement
`जेएन.1 व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सध्या लगेच रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. ज्या रुग्णांना पूर्वीपासून गंभीर आजार आहेत, त्यांना रुग्णालयात न्यावं लागत आहे. सर्दी, खोकला, सौम्य ताप अशी या व्हॅरिएंटची सामान्य लक्षणं आहेत. जगभरात सध्या ज्या लशी अस्तित्वात आहेत, त्या या व्हॅरिएंटवर पुरेशा प्रभावी आहेत,` असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.
advertisement
मॅक्स हॉस्पिटलमधल्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे एचओडी डॉ. राजीव डांग यांनी `टीव्ही नाइन`शी बोलताना सांगितलं की, `जेएन.1 व्हॅरिएंटची बहुतांश प्रकरणं फ्लूप्रमाणे आहेत. डब्ल्यूएचओनंदेखील हा व्हॅरिएंट गंभीर नसल्याचं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओ आणि सीडीसीच्या मते, सध्याच्या कोविड प्रतिबंधक लशी कोरोना व्हायरसच्या जेएन.1 या नव्या सब व्हॅरिएंटला रोखण्यात प्रभावी आहेत. जेएन.1 हा व्हॅरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हॅरिएंट आहे. त्यामुळे सध्याच्या लशी त्यावर प्रभावी ठरतील.`
advertisement
Corona Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढलं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचं जनतेला महत्त्वाचं आवाहन
लसीकरणाच्या माध्यमातून हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. तथापि, कोविड विषाणूमध्ये सतत होत असलेले बदल पाहता, युनिव्हर्सल लशीवरही काम केलं जात आहे. भारत बायोटेकचे शास्त्रज्ञ अशी लस तयार करण्यात व्यग्र आहेत. ही लस सर्व व्हॅरिएंट्सवर प्रभावी ठरेल.
advertisement
दिल्लीतल्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये कोविड नोडल अधिकारी म्हणून काम केलेल्या डॉ. अजित जैन यांनी सांगितलं, की `जेएन.1 व्हॅरिएंटसाठी कोरोना लशीचा आणखी एक डोस घेण्याची सध्या गरज नाही; मात्र काही रुग्णांना आणखी एक डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरचे तज्ज्ञ अंतिम निर्णय घेतील. या व्हॅरिएंटमुळे रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. सध्या रुग्णसंख्या कमी आहे; पण रुग्ण वाढले आणि जेएन.1 व्हॅरिएंटची रुग्णसंख्या वाढली तर लसीकरणाबाबत विचार होऊ शकतो.`
advertisement
सध्या नागरिकांमध्ये विषाणूविरोधात इम्युनिटीची पातळी कशी आहे हेदेखील पाहावं लागेल. जर रुग्ण वाढले. हॉस्पिटलायझेशन वाढलं नाही तर इम्युनिटी लेव्हल योग्य आहे. सध्या नागरिकांनी कोरोनासंदर्भात सतर्क राहावं आणि निष्काळजीपणा करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
Location :
Delhi
First Published :
December 21, 2023 11:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coronavirus JN.1 Variant - तुम्ही घेतलेली लस कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटवर प्रभावी आहे? WHO म्हणालं...