Famous Bhel Pune : बादशाही ते जनता भेळ, 57 वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध भेळ ठिकाण, इथली चव भारीच! VIdeo
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही नेहमीच चव आणि परंपरेचा संगम म्हणून ओळखली जाते. 57 वर्षांपासून इथली भेळ प्रसिद्ध आहे.
पुणे : पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही नेहमीच चव आणि परंपरेचा संगम म्हणून ओळखली जाते. मिसळ, वडापाव, आमटी-भात, लेमन टी अशा अनेक पदार्थांप्रमाणेच भेळही पुणेकरांच्या चवीचा एक अविभाज्य भाग आहे. याच चवीला गेल्या 57 वर्षांपासून आपल्या खास अंदाजात जपणारे ठिकाण म्हणजे रास्ता पेठेतील प्रसिद्ध इंटरव्हल भेळ. 1968 साली सुरू झालेले हे ठिकाण आजही पुणेकरांच्या इव्हनिंग स्नॅक्सचा अविभाज्य भाग बनले आहे.
या भेळीच्या स्टॉलची सुरुवात प्रशांत जोशी यांचे वडील यांनी 1968 मध्ये केली. त्या काळात फक्त 20 पैशांत मिळणारी ही भेळ आज 50 रुपयांपर्यंत पोहोचली असली, तरी तिची चव आणि लोकप्रियता मात्र जसंच्या तशी टिकून आहे. आज या व्यवसायात जोशी कुटुंबाची तिसरी पिढी कार्यरत आहे. प्रशांत जोशी सांगतात, आमच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता मुलगाही सांभाळतोय. ही आमच्या कुटुंबाची परंपरा झाली आहे. ग्राहक हे आमच्यासाठी कुटुंबाचाच एक भाग आहेत. चार पिढ्यांचे ग्राहक आजही इथे येतात आणि तीच जुनी चव अनुभवतात.
advertisement
इंटरव्हल भेळची खासियत म्हणजे येथे मिळणारे विविध प्रकार बादशाही भेळ, भडंग भेळ, फरसाण भेळ, सुकी भेळ आणि जनता भेळ हे प्रकार आजही तितकेच लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रकाराची स्वतःची चव आणि ओळख आहे. विशेष म्हणजे, भेळीत वापरले जाणारे मसाले हे अगदी माफक प्रमाणात असतात, त्यामुळे चव सौम्य पण चवदार राहते. हेच संतुलन पुणेकरांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी खेचून आणते.
advertisement
पुण्याच्या वाढत्या शहरीकरणात अनेक जुनी खाद्य ठिकाणं हरवत चालली आहेत, तरीही इंटरव्हल भेळने आपली ओळख अबाधित राखली आहे. नवनवीन फास्टफूड्सच्या युगातही ही पारंपरिक भेळ आजही लोकांच्या पसंतीची आहे. अनेक नामांकित व्यक्ती, विद्यार्थी आणि कुटुंबे दररोज संध्याकाळी या ठिकाणी थांबून एक प्लेट भेळ खातात, गप्पा मारतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात.
advertisement
अनेक पुणेकरांसाठी इंटरव्हल भेळ हे फक्त खाण्याचं ठिकाण नसून, ती एक आठवण आहे. कॉलेजच्या दिवसांची, मित्रमंडळींच्या भेटींची आणि पुण्याच्या खास चवीची. 57 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रवास आजही चव आणि परंपरेच्या सुगंधाने भरलेला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 3:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Bhel Pune : बादशाही ते जनता भेळ, 57 वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध भेळ ठिकाण, इथली चव भारीच! VIdeo