15 रुपयांत भरपेट नाश्ता, कोल्हापुरातील ही प्रसिद्ध ठिकाणे माहितीयेत का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरची खाद्य संस्कृती प्रसिद्ध असून येथे 10 ते 15 रुपयांपासून भरपेट नाश्ता मिळतो.
कोल्हापूर, 28 ऑक्टोबर : कोल्हापूरची खाद्य संस्कृतीसाठी एक वेगळी ओळख आहे. कोल्हापूर म्हटलं की तांबडा - पांढरा रस्सा आणि मिसळ आठवतेच. तसेच येथील वडापाव, आप्पे आणि इतर नाश्ता प्रकारही प्रसिद्ध आहेत. अगदी स्वस्तात मस्त नाश्त्याचे चविष्ट पदार्थ आपल्याला खायला मिळतात. कोल्हापुरातील विविध ठिकाणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फक्त दहा ते पंधरा रुपयांपर्यंत भरपेट नाश्ता मिळतो. अशीच स्वस्त आणि टेस्टी नाश्ता मिळण्याची काही ठिकाणे आपण पाहणार आहोत.
1) चक दे वडा - कोल्हापूर आणि वडापाव हे एक वेगळेच कनेक्शन आहे. हेच ओळखून मोहन चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून 10 रुपयांना मध्यम आकाराचा वडापाव, चटणी आणि मिरची असा नाश्ता दिवसभर देत होते. तर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी 12 रुपयांना वडापाव द्यायला सुरुवात केली आहे. खरंतर जयसिंगपूरचा प्रसिद्ध चक दे वडा ते ग्राहकांना कोल्हापूर शहरात देत आहेत. दिवसभरात साधारण 400 ते 500 वडापाव खपतात.
advertisement
पत्ता : फोर्ड कॉर्नर जवळ, परमाळे सायकल शेजारी, कोल्हापूर
वेळ : सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत
2) महालक्ष्मी नाश्ता सेंटर - स्नेहा बाळेकुंद्री आणि त्यांचे पती श्रीराम बाळेकुंद्री हे नाश्ता सेंटर चालवतात. गेली 12 वर्षे ते कोल्हापूरच्या पद्माळा परिसरात एस. एम. लोहिया शाळे समोर ही नाश्त्याची गाडी लावतात. त्यांच्याकडे आप्पे, डोसा 10 रुपयांना, इडली 20 रुपयांना, आंबोळी 15 रुपयांना, उत्ताप्पा 25 रुपयांना असे सर्व साऊथ इंडियन पदार्थ अत्यंत कमी दरात मिळतात. विद्यार्थ्यांसाठी म्हणून कमी दरात विकायला सुरुवात करुन त्यांनी आजही तोच दर ठेवला आहे.
advertisement
पत्ता : एस. एम. लोहिया शाळे समोर, पद्माळा, कोल्हापूर.
वेळ : सकाळी 7 ते दुपारी 2
3) करवीर मिसळ - कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या समोरच गेली 10 वर्षे 10 रुपयांना आंबोळी तर 15 रुपयांना मिसळ हे पदार्थ मिळतात. सीपीआर रुग्णालय अर्थात थोरला दवाखाना हे गरिब रुग्णांसाठी हक्काचे रुग्णालय आहे. इथे येणाऱ्या कित्येक जणांकडे औषधे घेण्यासाठी देखील पैसे नसतात. त्यामुळेच नाझिमा मणेर आणि नजीर मणेर यांनी पदार्थांचे दर इतके कमी ठेवले आहेत.
advertisement
पत्ता : टाऊन हॉल गार्डन बाहेर, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 3
4) संदीप टी स्टॉल - साधारण 1982 पासून कोल्हापुरच्या व्हिनस कॉर्नर जवळ संदीप टी स्टॉलवर स्वस्तात नाश्त्याचे पदार्थ मिळतात. जवळच व्यापार पेठ असल्यामुळे हमालांना, रिक्षा चालकांना परवडावे, यासाठी याठिकाणी इतके कमी दर ठेवले आहेत. इथे फक्त 10 रुपयांना शिरा, उप्पीट, कांदापोहे, 12 रुपयांना वडापाव आणि पाववडा (पॅटीस), 20 रुपयांना कटवडा, मिसळपाव, बटाटेभजी, कांदाभजी, मिरचीभजी तसेच चहा फक्त 6 रुपयांना मिळतो.
advertisement
पत्ता : व्हिनस कॉर्नर बसस्टॉपच्या पाठीमागे, कोल्हापूर
वेळ : सकाळी 5.30 ते दुपारी 12
5) नारायणी टी स्टॉल - कोल्हापूर शहरात संध्याकाळी ४ नंतर फेरफटका मारताना कोल्हापूर महानगरपालिका चौकात आपल्याला बासुंदी चहा आणि मसाले दुधाचा घमघमाट अनुभवायला मिळतो. याठिकाणी पतीच्या निधनानंतर आपल्या घरच्या मंडळींना सोबत घेऊन कष्टाने प्रसिद्धीस आणलेला नारायणी बासुंदी चहा असा चहाचा गाडा आहे. या गाड्यावर मिळणाऱ्या चहाची आणि मसाले दुधाची चव चाखायला लोक लांब लांबहून येतात. सध्या त्यांच्या घरची चौथी पिढी हा व्यवसाय करत आहे. याठिकाणी बासुंदी चहाची किंमत 10 रुपये असून मसाले दूध हे 10, 20 आणि 30 रुपयांना मिळते.
advertisement
पत्ता : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारती शेजारी, कोल्हापूर
वेळ : सायं. 4 ते रात्री 12
दरम्यान, यासह अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळच्या वेळी स्वस्तात मस्त पोहे, उपीट असा नाष्टा मिळत असतो. त्यामुळे खवय्यांना कोल्हापुरात नाश्त्यासाठी आणि चविष्ट खाण्यासाठी बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्स उपलब्ध आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 28, 2023 9:21 AM IST