Government Hospital: तेलंगणानं जे केलं तेच महाराष्ट्र करणार, सरकारी रुग्णालयांबाबत मोठा निर्णय
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Government Hospitals: महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांच्या स्वच्छतेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणाच्या धर्तीवर हा निर्णय असून त्याचा रुग्णांना फायदा होईल.
पुणे : रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संक्रमणजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी आता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत रोज वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीटचा वापर करण्यात येईल. जालना जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर प्रमुख रुग्णालयांतही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये हिरवा, गुलाबी आणि पांढरा अशा तीन रंगांच्या बेडशीट्स ठराविक क्रमाने बदलल्या जाणार आहेत.
स्वच्छतेसाठी राज्य सरकारचा नवा उपक्रम
या नव्या उपक्रमामुळे कोणत्या दिवशी कोणते बेडशीट वापरले आहे, हे लगेच ओळखता येणार आहे. रुग्णालयात बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, पडदे, गणवेश आणि टॉवेल यांसह सर्व वस्त्रांची धुलाई आता पूर्णतः यांत्रिक आणि निर्जंतुकीकरण पद्धतीने करण्यात येईल. या यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप टाळला जाईल आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होईल. नव्या स्वच्छता प्रणालीमुळे हॉस्पिटलमधील स्वच्छता राखली जाईल, तसेच रुग्णांच्या आरोग्य सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
कुठल्या दिवशी बेडशीटचा कोणता रंग?
हॉस्पिटलमध्ये आता दररोज ठराविक रंगांच्या बेडशीटचा वापर केला जाणार आहे. सोमवार आणि गुरुवारी हिरवा रंग, मंगळवार आणि शुक्रवारी पांढरा रंग, तर बुधवार आणि शनिवारी गुलाबी रंगाच्या बेडशीट्स वापरल्या जातील. रंगानुसार दिवस ठरवला असल्याने कोणती बेडशीट आधी वापरली आहे, हे समजण्यास मदत होणार आहे. या नियमामुळे प्रत्येक वॉर्डमधील बेडशीट रोज बदलली जाणार आहेत.
advertisement
दरम्यान, बेडशीट बदलण्याचा हा उपक्रम तेलंगणा राज्याने सर्वप्रथम राबवला होता आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांतही हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 2:29 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Government Hospital: तेलंगणानं जे केलं तेच महाराष्ट्र करणार, सरकारी रुग्णालयांबाबत मोठा निर्णय





