Health Tips : हिवाळ्यात केसांमध्ये होतोय कोंडा? हे उपाय लगेच करा, राहाल गंभीर आजारांपासून दूर
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हिवाळ्यात केसांत होणारा कोंडा फक्त फंगल इन्फेक्शन नाही तर सेबोरिक डर्माटायटीस, सोरायसिस सारखे गंभीर आजार असू शकतात.
अमरावती : हिवाळ्यात अनेकांना केसांत कोंडा होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. अशावेळी एखादा अँटी डँड्रफ शाम्पू वापरून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण, हिवाळ्यात केसांत होणारा कोंडा फक्त फंगल इन्फेक्शन नाही तर सेबोरिक डर्माटायटीस, सोरायसिस सारखे गंभीर आजार असू शकतात. ही समस्या कशी ओळखायची? काय करावं? काय करू नये? याबाबत अधिक माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात केस कोरडे होतात. कोंडा भरपूर प्रमाणात होतो. पण, हिवाळ्यात होणारा कोंडा हा फंगल इन्फेक्शनमुळेच होतो असे नाही. तर दोन गंभीर आजार देखील असू शकतात. ते म्हणजे सेबोरिक डर्माटायटीस आणि सोरायसिस. सेबोरिक डर्माटायटीस या आजारात केसांच्या मुळांजवळ पिवळ्या/पांढऱ्या कोंड्यासारखा खवला होतो. त्याला खाज येते. तसेच सोरायसिसमध्ये डोक्यावर जाड, लाल चट्टे, त्यावर पांढरे/चांदीसारखे खवले हलकी ते जास्त खाज ही लक्षणे दिसून येतात.
advertisement
या चुका टाळाव्यात
अनेकदा केसांत कोंडा झालाय म्हणून त्याला दही, अंडी, मेहंदी लावली जाते. पण, यामुळे त्रास आणखी वाढू शकतो. त्याचबरोबर केसांच्या मुळाशी पुरळ असतील किंवा जखम असेल तर तेल लावणे टाळावे. त्यामुळे केसांत आणखी इन्फेक्शन होऊन जखम होऊ शकते आणि त्रास वाढू शकतो.
advertisement
काय काळजी घ्यावी?
केसांत कोंडा किंवा आणखी काही समस्या दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने आजार ओळखूनच त्यावर उपचार घ्यावेत. साधा कोंडा असल्यास अँटी डँड्रफ शाम्पू वापरू शकता. पण, आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने शाम्पू आणि ट्रीटमेंट घ्या. तसेच केसांची स्वच्छता ठेवा. आठवड्यातून 2 वेळा केस धुवा. नेहमी वापरत आलेला कंगवा गरम पाण्याने धुवून स्वच्छ ठेवा. केसांत तेल लावू किंवा आणखी काहीच लावू नका, अशी माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात केसांमध्ये होतोय कोंडा? हे उपाय लगेच करा, राहाल गंभीर आजारांपासून दूर








