तुरीच्या दाण्यांपासून बनवा स्वादिष्ट वडे, बघा घरगुती रेसिपी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
10 मिनिटांत तयार होणारी अगदी सोपी रेसिपी वर्धा येथील गृहिणी नलिनी धानोरकर यांनी सांगितली आहे.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: हिवाळा सुरू झाला की घराघरात खास रेसिपी केल्या जातात. या काळात तुरीचे दाणे सहज उपलब्ध होतात. तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आपण तुरीचे वडे कधी ट्राय केलेत का? 10 मिनिटांत तयार होणारी अगदी सोपी रेसिपी वर्धा येथील गृहिणी नलिनी धानोरकर यांनी सांगितली आहे.
वड्यासाठी लागणारे साहित्य
तुरीचे दाणे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी चना डाळीचं पीठ(बेसन), चवीनुसार तिखट, हळद, मीठ, जिरे, धने, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, पातळ चिरलेला कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या.
advertisement
वडे बनवण्याची कृती
सर्वप्रथम तुरीचे दाणे आणि हिरव्या मिरच्या, त्यात कढीपत्ता घालून मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्या. पेस्ट करायची नाही. आता एका बाउल मध्ये हे मिश्रण काढून घेऊन त्यात चना डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात तिखट, मीठ, हळद,कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरे, हळद, मीठ, कोथिंबीर घालून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. हे मिश्रण एकजीव करताना फक्त पाण्याचा हात घ्यावा. पाणी घालायचं नाही.
advertisement
मिश्रण चांगल एकत्र झालं की त्याचे हातावर चपटे गोळे करून घ्यायचे. गरम तेलात लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता तुरीचे दाण्याचे वडे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत हे वडे सर्व्ह करू शकता. अशाप्रकारे अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही देखील नाश्त्यासाठी हे तुरीच्या दाण्यांचे वडे रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
January 06, 2024 5:27 PM IST