Skin Care : चेहऱ्यावरच्या मुरुमांवर आयुर्वेदिक उपाय, कडुनिंबाच्या फेसमास्कमुळे चेहरा दिसेल सुंदर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
धूळ, प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे त्वचेची चमक कमी होते आणि मुरुम येतात. आयुर्वेदात यासाठी कडुनिंबाचे काही फेसपॅक सांगितलेत. कडुनिंबामधे जीवाणूनाशक, बुरशीनाशक आणि दाहशामक गुणधर्म आहेत, मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना ते नष्ट करतात आणि त्यांचे व्रण कमी करण्यास मदत करतात.
मुंबई : उन्हाचा कडाका वाढतोय, मुंबईसारख्या ठिकाणी आद्रतेमुळे आणखी उकडतं. तुम्ही रोज घराबाहेर पडत असाल आणि घामाघूम होऊन येत असाल तर इथे दिलेल्या टिप्सचा तुम्हाला उपयोग होईल.
धूळ, प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे त्वचेची चमक कमी होते आणि मुरुम येतात. आयुर्वेदात यासाठी कडुनिंबाचे काही फेसपॅक सांगितलेत.
कडुनिंबामधे जीवाणूनाशक, बुरशीनाशक आणि दाहशामक गुणधर्म आहेत, मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना ते नष्ट करतात आणि त्यांचे व्रण कमी करण्यास मदत करतात.
advertisement
कडुनिंब आणि हळदीचा फेस पॅक - कडुनिंब आणि हळदीत औषधी गुणधर्म असतात. चेहऱ्यावर लाल मुरुम असतील आणि त्यामुळे वेदना होत असतील तर त्यांच्यासाठी हा पॅक विशेषतः उपयुक्त आहे. हा पॅक बनवण्यासाठी, एक मोठा चमचा कडुनिंबाच्या पानांची पावडर घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा. थोडं पाणी किंवा गुलाबजल घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावरील मुरुमांवर लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनंतर थंड पाण्यानं धुवा. हळदीमुळे सूज कमी होते, तर कडुनिंबामुळे संसर्ग टाळणं शक्य होतं.
advertisement
कडुनिंब आणि मुलतानी माती - त्वचा खूप तेलकट असेल, तर कडुनिंबासोबत मुलतानी मातीचा वापर करावा. हा पॅक त्वचेच्या छिद्रांमधील अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचेला खोलवर स्वच्छ करतो. एक चमचा मुलतानी माती, एक चमचा कडुनिंब पावडर आणि गुलाबजल एकत्र मिसळा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ती सुकल्यावर साध्या पाण्यानं धुवा. यामुळे चेहऱ्यावरील तेल नियंत्रित ठेवण्यास आणि नवीन मुरुमं येण्यापासून रोखण्यास मदत होते.
advertisement
कडुनिंब आणि कोरफडीचा फेस पॅक - कधीकधी मुरुमांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. कोरफडीमुळे त्वचा आर्द्र राहते, तर कडुनिंबामुळे मुरुमांवर उपचार करण्यास मदत होते. कोरफडीचा ताजा गर घ्या आणि त्यात एक चमचा कडुनिंब पावडर मिसळा. या मिश्रणानं चेहऱ्यावर दोन-तीन मिनिटं हलक्या हातानं मसाज करा आणि नंतर पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. मुरुमांचे डाग फिके करण्यासाठी हा पॅक उत्कृष्ट आहे.
advertisement
ताजा कडुनिंब आणि दह्याचा फेस पॅक - दह्यामधे लॅक्टिक ॲसिड असतं, यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि कडुनिंबामुळे त्वचेतील अशुद्धी स्वच्छ होते. हा पॅक त्वचेचा रंग सुधारण्यासही मदत करतो. एक मोठा चमचा कडुनिंबाची पेस्ट एक मोठा चमचा ताज्या दह्यामधे मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. दह्याच्या थंडपणामुळे मुरुमांची जळजळ शांत होईल आणि त्वचा उजळ होईल.
advertisement
चेहऱ्यावर कोणताही पॅक लावण्यापूर्वी, कानाच्या मागे पॅच टेस्ट करून जळजळ किंवा ऍलर्जी येत नाही ना हे तपासा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यावरच्या मुरुमांवर आयुर्वेदिक उपाय, कडुनिंबाच्या फेसमास्कमुळे चेहरा दिसेल सुंदर










