घरात नवीन रंग मारल्यानंतर घुसमटल्या सारखं का वाटतं? खोकला का येतो? हे आहे यामागचं खरं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
घर रंगवून झाल्यावर जर तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांना सतत खोकला, घशात खवखव किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो निव्वळ योगायोग नाही. पेंटमधील घातक घटक तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असल्याचे हे लक्षण असू शकते.
मुंबई : आपल्या स्वप्नातील घर बनवणं कोणाला आवडत नाही? घराला नवा रंग दिला की भिंती चमकू लागतात, वातावरणात एक वेगळीच ताजगी येते आणि मन प्रसन्न होतं. पण, या नवीन पेंटचा जो एक विशिष्ट 'केमिकल' सारखा वास येतो, त्याकडे तुम्ही कधी गांभीर्याने लक्ष दिलं आहे का? अनेकांना हा नव्या घराचा वास आवडतो, पण विज्ञान सांगतं की हा सुगंध नसून हवेत विरघळलेली घातक रसायने आहेत.
घर रंगवून झाल्यावर जर तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांना सतत खोकला, घशात खवखव किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो निव्वळ योगायोग नाही. पेंटमधील घातक घटक तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असल्याचे हे लक्षण असू शकते. पेंटिंग आणि आरोग्याचा काय संबंध आहे आणि आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो, हे सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
VOC म्हणजे काय?
पेंट, वार्निश, थिनर आणि चिकटवणाऱ्या पदार्थांमध्ये व्होलटाईल ऑर्गेनिक कंपाउंड्स (VOC) असतात. यामध्ये फॉर्मल्डिहाइड, बेंझिन आणि टोल्युएन सारखी विषारी रसायने असतात. युनायटेड स्टेट एनवायरनमेंट प्रोटेक्शन एजन्सीनुसार, पेंटिंग सुरू असताना घरातील हवेतील प्रदूषणाची पातळी बाहेरच्या हवेपेक्षा कैक पटीने जास्त असू शकते.
फुफ्फुसांवर होणारा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, हे घटक श्वसनामार्फत शरीरात गेल्यावर फुफ्फुसांच्या नळ्यांमध्ये (Bronchial Tubes) सूज निर्माण करू शकतात.
advertisement
सतत येणारा कोरडा खोकला, छातीत जडपणा जाणवणे, धाप लागणे आणि घशात जळजळ होणे सारख्या समस्या उद्भवतात.
कोणाला जास्त धोका? लहान मुले, वृद्ध व्यक्ती, दम्याचे (Asthma) रुग्ण आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांसाठी हा धोका अधिक गंभीर असतो. दीर्घकाळ अशा वातावरणात राहिल्याने 'क्रॉनिक ब्रोंकायटिस' सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
तज्ज्ञ काय सांगतात?
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे तांत्रिक उपाध्यक्ष डॉ. आकाश शाह यांच्या मते, पेंटिंगनंतर जर 3 ते 4 आठवड्यांपर्यंत खोकला कमी झाला नाही, तर फुफ्फुसांची तपासणी करणे अनिवार्य आहे. खराब वेंटिलेशन ही समस्या अधिक गंभीर बनवते. जर खिडक्या बंद असतील आणि तुम्ही फक्त एसीवर अवलंबून असाल, तर हे केमिकल हवेत अडकून राहतात आणि तुमच्या श्वासात जातात.
advertisement
सुरक्षित राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा:
1. पेंटची निवड: शक्य असल्यास 'Low-VOC' किंवा 'No-VOC' लेबल असलेले पेंट निवडा. हे आरोग्यासाठी कमी घातक असतात.
2. क्रॉस-वेंटिलेशन: पेंटिंग दरम्यान आणि नंतर किमान 48 ते 72 तास खोलीच्या खिडक्या पूर्णपणे उघड्या ठेवा. हवेचा प्रवाह राहिल्याने रसायने लवकर बाहेर निघून जातात.
3. मास्कचा वापर: पेंटिंग सुरू असताना एन-95 मास्क वापरणे फायदेशीर ठरते.
advertisement
4. लहान मुले आणि वृद्धांची काळजी: घरात पेंटिंग सुरू असताना लहान मुले आणि ज्येष्ठांना काही दिवस दुसऱ्या खोलीत किंवा नातेवाईकांकडे ठेवणे उत्तम.
5. एसी टाळा: पेंट पूर्णपणे सुकेपर्यंत आणि वास जाईपर्यंत एसीचा वापर टाळा, कारण तो घरातील दूषित हवा पुन्हा पुन्हा फिरवत राहतो.
घर सुंदर दिसणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचं आरोग्यही महत्त्वाचं आहे. रंगांचा उत्साह साजरा करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर खोकला महिनाभर टिकला, तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 6:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
घरात नवीन रंग मारल्यानंतर घुसमटल्या सारखं का वाटतं? खोकला का येतो? हे आहे यामागचं खरं कारण









