World Stroke Day 2025 : शरीरातील 'या' बदलांकडे दुर्लक्ष टाळा, तज्ज्ञांनी सांगितली स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Symptoms Cause And Precautions For Stroke : जगभरात मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणून स्ट्रोक ओळखला जातो. स्ट्रोक कोणालाही, कुठेही होऊ शकतो. अनेक लोकांना स्ट्रोकसाठी कारणीभूत असणारे जोखीम घटक, चेतावणी चिन्हे किंवा स्ट्रोक प्रतिबंध याबद्दल माहिती नसते.
मुंबई : दरवर्षी 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्ट्रोक दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याचा मुख्य उद्देश हा जगभरात स्ट्रोकबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्याची कारणे, प्रतिबंध आणि उपचाराबद्दल माहिती देणे हा असतो. जगभरात मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणून स्ट्रोक ओळखला जातो. स्ट्रोक कोणालाही, कुठेही होऊ शकतो. अनेक लोकांना स्ट्रोकसाठी कारणीभूत असणारे जोखीम घटक, चेतावणी चिन्हे किंवा स्ट्रोक प्रतिबंध याबद्दल माहिती नसते. वेळेवर उपचार मिळाल्यास स्ट्रोकमुळे होणारे नुकसान आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
यंदा साजरा होणाऱ्या ‘जागतिक स्ट्रोक दिन 2025’ चे मुख्य सूत्र हे 'प्रत्येक मिनिट महत्त्वाचा' (Every Minute Counts) असे आहे. हे सूत्र, स्ट्रोकमुळे होऊ शकणाऱ्या गंभीर स्वरूपांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत मिळण्याच्या गरजेवर भर देते. वेळेवर उपचार मिळाल्यास स्ट्रोकमुळे होणारे नुकसान आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. स्ट्रोकची लक्षणे लवकर ओळखून, आवश्यक ते वैद्यकीय उपचार त्वरित सुरु करणे अत्यंत महत्वाचे असते. त्यासाठीची जागरुकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी जगभर आजचा दिवस पाळला जातो. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथील न्युरोसर्जन, डॉ. मच्छिंद्रनाथ निलंगे (एम.बी.बी.एस., एम.एस., एम.सीएच. न्युरोसर्जरी, डी.एन.बी. न्युरोसर्जरी) यांनी स्ट्रोकबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
स्ट्रोकची कारणे..
एखाद्या कारणामुळे मेंदूमधील रक्ताचा पुरवठा थांबतो अथवा मेंदूतील रक्तवाहिनीतून रक्तस्त्राव होऊ लागतो, त्याला ब्रेन स्ट्रोक असे संबोधतात. ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या परिणाम हे तात्पुरत्या, दीर्घकालीन अथवा मृत्यू आदींच्या स्वरूपात असू शकतात. मेंदूला झालेल्या इजेमुळे पक्षाघात, कोमा, किंवा ब्रेनडेडसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
स्ट्रोकचे प्रकार..
मुख्यत्वे स्ट्रोक दोन प्रकारचे असतात, इस्चेमिक आणि हेमोरेजिक स्ट्रोक. इस्चेमिक स्ट्रोक हा मेंदूमधील रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे होतो. यामध्ये मेंदूतील पेशींना आवश्यक असणाऱ्या प्राणवायू आणि पोषक घटकांच्या अभावामुळे मेंदुंच्या पेशी निष्क्रिय होतात. हेमोरेजिक स्ट्रोक हा मेंदूतील रक्तवाहिनीतून रक्तस्त्राव झाल्यामुळे होत असतो.
advertisement
ह्या स्त्रावलेल्या रक्तामुळे मेंदुंच्या पेशींवर दाब निर्माण होतो, त्यामुळे त्याचे कार्य प्रभावित होते आणि त्या निष्क्रिय होऊ शकतात. मेंदू हा शरीराच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करणारा अवयव आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या परिणामांमध्ये मेंदूच्या प्रभावित भागाकडून होणाऱ्या कार्यांमध्ये झालेल्या अपायांनुसार लक्षणे आढळतात. स्ट्रोकची सुरवातीची लक्षणं ओळखता आली तर त्यामुळे होऊ शकणाऱ्या अपंगत्व अथवा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.
advertisement
स्ट्रोकची लक्षणे..
जागतिक स्ट्रोक संघटनेने (WSO) स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी 'F.A.S.T.' ही सोपी पद्धत सांगितलेली आहे. तसेच F.A.S.T. हा संक्षिप्त रूप वापरण्यास प्रोत्साहन दिले.. F - चेहरा झुकणे/वाकणे, A - हात कमकुवत होणे, S - बोलण्यात अडचण, T - कॉल करण्याची वेळ.
F - Face Drooping म्हणजेच चेहरा झुकणे किंवा वाकडा होणे : व्यक्ती हसताना चेहऱ्याची एक बाजू खाली झुकते का? हे तपासणे.
advertisement
A - Arm Weakness म्हणजेच हात कमजोर होणे : व्यक्ती दोन्ही हात वर करू शकते का? हे तपासणे. एक हात खाली झुकणे किंवा ताकत कमी होणे, हेदेखील एक लक्षण असू शकते.
S - Speech Difficulty म्हणजेच बोलताना अडखळणे : व्यक्तीला साधे वाक्य उच्चारण्यास सांगा. बोलताना अडखळणे किंवा अस्ताव्यस्त बोलणे, हे लक्षण असू शकते.
advertisement
T - Time to call emergency services म्हणजेच वैद्यकीय आपत्कालीन मदत घेण्याची वेळ : वरीलपैकी कोणतीही किंवा सर्व लक्षणे दिसल्यास, तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी.
विशेषतः शरीराच्या एका बाजूला चेहरा, हात किंवा पाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवणे, गोंधळ, किंवा बोलण्यात अडचण येणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये दिसण्यात त्रास, चालण्यात त्रास, चक्कर येणे, संतुलन किंवा समन्वय बिघडणे तसेच कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी हे इतर लक्षणेही ब्रेन स्ट्रोकच्या वेळी आढळून येतात. त्यामुळे या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये.
advertisement
ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्णाच्या परिणामांच्या तपासणीसाठी सिटी स्कॅन अथवा एमआरआय तपासणी करणे, गरजेचे असते. ब्रेन स्ट्रोक होण्यासाठी मुख्यत्वे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली, तंबाखू, हृदयरोग, अधिक मद्यपान, रक्तातील मेदाचे अतिरिक्त प्रमाण, अपोषक आणि घातक भोजन आदी बाबी जास्त प्रमाणात जबाबदार असतात.
स्ट्रोक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा..
ब्रेन स्ट्रोकसारखे आजार टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबणे फायद्याचे ठरू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे घातक आणि सर्वाधिक परिमाण करणाऱ्या बाबींवर निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येवू शकते. रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल हे वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक असल्यास औषधाच्या सहाय्याने नियंत्रित ठेवून स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो.
कोणत्याही माध्यमातून मद्यपान आणि तंबाकूचे सेवन हे ब्रेन स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे मद्यपान, धुम्रपान आणि इतर प्रकारांद्वारे तंबाकूचे सेवन टाळणे अथवा कमी करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
जीवनशैलीतील बदल हा निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांच्यामाध्यामातूनही आरोग्याची काळजी घेता येऊ शकते. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक घटकांचा समवेश असलेला आहार घ्यावा, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच मीठ, साखर, तेल आदींचा वापर प्रमाणत करावा.
नियमित शारीरिक हालचाली केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, हृदय आणि रक्तवाहिन्याही निरोगी राहतात. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या आजार टाळण्यास फायदा होतो. तसेच नियमित आरोग्य तपासणीच्या माध्यमातूनही भविष्यात होऊ शकणारे धोके टाळता येतात. वरील घटकांचा अवलंब केल्यास निरोगी जीवन जगणे शक्य होऊ शकते.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 10:43 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World Stroke Day 2025 : शरीरातील 'या' बदलांकडे दुर्लक्ष टाळा, तज्ज्ञांनी सांगितली स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे!


