'माणगाव'च्या निकालाची नोंद जग घेणार; मतदारांनी MBA शिकलेल्या मुलीला जिंकवले; कोण आहेत 23 वर्षाच्या मानसी भोगण?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Kolhapur Zilla Parishad Result: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत 23 वर्षीय उच्चशिक्षित तरुणी मानसी कल्लाप्पा भोगण यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंदगड तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर: जेव्हा एखादा भाग 'दुर्गम' किंवा 'मागास' म्हटला जातो, तेव्हा तिथल्या राजकारणाबद्दल अनेक गृहितकं मांडली जातात. पण चंदगड तालुक्यातील माणगाव मतदारसंघाने हे सर्व गैरसमज मोडीत काढले आहेत. एका 23 वर्षांच्या, MBA शिक्षण घेतलेल्या तरुणीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देत, इथल्या कष्टकरी मतदारांनी प्रगत शहरांतील मतदारांनाही लाजवेल असा आदर्श घालून दिला आहे. ही गोष्ट आहे मानसी कल्लाप्पा भोगण यांची...
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत तरुण नेतृत्वाचा ठळक उदय झाला असून, अवघ्या 23 वर्षांच्या उच्चशिक्षित तरुणी मानसी कल्लाप्पा भोगण यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दणदणीत विजय मिळवला आहे. चंदगड तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक जिंकत जिल्ह्यात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मानसी भोगण निवडणूक रिंगणात होत्या. तरुण व अभ्यासू उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात विकास, प्रशासनातील पारदर्शकता आणि युवक-महिला प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर दिला. मतदारांनीही त्यांच्या या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा देत विजयाचा कौल दिला आहे.
advertisement
मानसी भोगण या एमबीए (MBA) शिक्षण घेतलेल्या असून, उच्च शिक्षण आणि आधुनिक व्यवस्थापनाचा अनुभव आता त्या जिल्हा परिषदेच्या कारभारात वापरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी नियोजनबद्ध कामकाज, निधीचा योग्य वापर आणि प्रशासनात शिस्त आणण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले होते.
या विजयामुळे चंदगड तालुक्यात तरुण नेतृत्वाला मोठे बळ मिळाले आहे. या निकालानंतर पारंपरिक राजकारणाला छेद देत नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश मतदारांनी दिल्याचे चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः महिलांच्या सहभागाच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
निकाल जाहीर होताच माणगावसह परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मानसी भोगण यांच्या विजयाचे स्वागत करत हा विजय तरुणाई, शिक्षण आणि नव्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक असलेल्या मानसी भोगण यांच्याकडून ग्रामीण विकास, शिक्षण, रोजगार आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर ठोस कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माणगाव'च्या निकालाची नोंद जग घेणार; मतदारांनी MBA शिकलेल्या मुलीला जिंकवले; कोण आहेत 23 वर्षाच्या मानसी भोगण?









