Funeral facility: मृत्यूनंतरही यातना संपेना, ताडपत्री धरून पावसात अंत्यसंस्कार, छत्रपती संभाजीनगरात दुर्दैवी प्रकार
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Funeral facility: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1332 गावांपैकी तब्बल 231 गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर: मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रत्येक धर्मात काही विधी केले जातात. हिंदू धर्मात देखील, मृत व्यक्तीचे कुटुंबीय शक्य तितके प्रयत्न करून अंत्यसंस्करापासून ते वर्षश्राद्धापर्यंतचे सर्व विधी करण्याचा प्रयत्न करतात. मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, काही व्यक्तींच्या नशिबात मृत्यूनंतरही शांती नसते. मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार देखील व्यवस्थित पार पडत नाहीत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात अशीच घटना समोर आली आहे. खांडी पिंपळगाव येथे स्मशानभूमी नसल्यामुळे मृत दलित व्यक्तीवर भर पावसात ताडपत्रीच्या खाली अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडी पिंपळगाव येथील पांडुरंग शहाजी भालेराव यांचं सोमवारी (1 सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झालं. कुटुंबातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली. मात्र, गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला? यातून पर्यायी मार्ग काढत दलित वस्तीच्या शेजारी असलेल्या गायरान जमिनीत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
Khuldabad Urs 2025: छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल, जड वाहनांना हे रस्ते बंद, पर्यायी मार्ग
ठरल्याप्रमाणे दुपारी 3 वाजेच्या सुमारास नातेवाईक पार्थिव घेऊन गायरान जमिनीवर आले. मात्र, अंत्यविधी पूर्ण होण्याअगोदर पाऊस आला तर अडचण होईल, यामुळे नातेवाईकांनी ताडपत्री आणली. पाऊस लागू नये यासाठी अंत्यसंस्कार करत असताना लाकडे लावून ताडपत्री ठेवण्यात आली. या संपूर्ण अंत्यविधीसाठी नातेवाईकांना 15 लिटरपेक्षा अधिक डिझेल वापरावं लागलं. या घटनेमुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
advertisement
जिल्ह्यात 231 गावांना स्मशानभूमीच नाही
खुलताबाद येथील घटनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील 1332 गावांपैकी तब्बल 231 गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खांडी पिंपळगाव सह स्मशानभूमी नसलेल्या गावांना तात्काळ स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
"खांडी पिंपळगाव येथे स्मशानभूमी नाही. ज्यांच्याकडे शेती आहे ती कुटुंबं शेतातच अंत्यविधी करतात. मात्र, भूमीहीन दलित मागासवर्गीय कुटुंबांना अंत्यविधीसाठी प्रचंड हाल सहन करावे लागतात. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ता होऊ पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. आमच्या गावात तात्काळ स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. नाहीतर तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करू," असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी दिला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 03, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Funeral facility: मृत्यूनंतरही यातना संपेना, ताडपत्री धरून पावसात अंत्यसंस्कार, छत्रपती संभाजीनगरात दुर्दैवी प्रकार