मीच मुलाखत घ्यायला पाहिजे... आदित्य ठाकरेंचा यॉर्कर, फडणवीसही खळखळून हसले, स्वागतासाठी ५ मिनिटे थांबले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Aaditya Thackeray Welcome CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटवर्क १८ च्या एका कार्यक्रमात आले असताना प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महायुतीतील कलंकित मंत्र्यांना हटविण्यासाठी जोरदार आंदोलन झालेले असताना आणि स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय काही महापालिकांनी घेतल्याने शिवसेनेने कडाडून विरोध केलेला असताना, अशा राजकीय गदारोळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईत बुधवारी भेट झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'नेटवर्क १८' च्या एका कार्यक्रमात आले असताना प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. फडणवीस येत असल्याचे कळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तब्बल ५ ते १० मिनिटे त्यांच्या ताफ्याची वाट पाहिली. फडणवीस येताच हस्तांदोलन करून आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.
मीच तुमची मुलाखत घेतली पाहिजे.... आदित्य ठाकरे यांचा यॉर्कर
advertisement
'नेटवर्क १८ हिंदी' वाहिनीवरील एका खास कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईतील टाऊन हॉल या ठिकाणी आलेले होते. याच कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनीही उपस्थित लावली होती. मुलाखत संपवून आदित्य ठाकरे जायला निघाले, तेव्हा फडणवीस देखील पुढच्या काही क्षणांत येणार आहेत, असा निरोप त्यांना मिळाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी ५-१० मिनिटे फडणवीस यांच्या येण्याची वाट पाहिली.
advertisement
देवेंद्र फडणवीस गाडीच्या खाली उतरल्यानंतर त्यांना आदित्य ठाकरे समोर दिसले. स्वागतालाच आदित्य ठाकरे थांबल्याने आश्चर्यकारक नजरेने फडणवीस यांनी पाहिले. आदित्य ठाकरेंनी त्यांचे स्वागत करून "खरे तर मीच मुलाखत घ्यायला हवी होती", असा यॉर्कर फडणवीस यांना टाकला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस खळखळून हसले.
advertisement
महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाची नवी परंपरा सुरू झाल्याने पक्षीय भेदाभेद विसरून जुन्या काळासारखे नेते एकमेकांना भेटत नाही किंबहुना बोलतही नाहीत. मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांचे केलेले स्वागत आणि त्यांच्याशी काही क्षण का होईना खेळीमेळीच्या वातावरणात साधलेला संवाद, हा प्रसंग दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात राहण्याजोगा आहे. दोन्ही नेत्यांच्या अनपेक्षित भेटीने कार्यकर्तेही सुखावले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मीच मुलाखत घ्यायला पाहिजे... आदित्य ठाकरेंचा यॉर्कर, फडणवीसही खळखळून हसले, स्वागतासाठी ५ मिनिटे थांबले