Special Report: चार पवार-चार दिशेला, पवार घराण्यातील संघर्षाला अजितदादांच्या माघारीही धार!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईत उचललेल्या पावलामुळे शपथविधीवेळी पवार कुटुंबातील चार तोंडे चार दिशेला होती, असे चित्र महाराष्ट्रासमोर गेले.
मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत असतानाच दादांचे पक्षातील सवंगडी कमालीचे सक्रीय झाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपले पक्षातील स्थान आणि सत्तेतील वाट्यात 'वाटेकरी' येऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर असताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाही तोपर्यंत सुनेत्रा पवार यांना 'संबंधितांच्या' आग्रहाखातर शपथही घ्यायला लागली. मात्र या साऱ्या घटनेचे नियोजन शरद पवार यांच्या अपरोक्ष होईल, याची दक्षता पक्षातील महत्त्वकांक्षी नेत्यांनी घेतली. त्यामुळे मुंबईतल्या घडामोडी आपल्याला ज्ञात नाही किंबहुना सुनेत्रा पवार आज शपथ घेतील, याबद्दलही आपल्याला अजिबात माहित नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. याचाच अर्थ अजित पवार यांच्या जाण्यानंतरही पवार घराण्यातला सत्तासंघर्ष अजूनही 'जैथे थे' आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईत उचललेल्या पावलामुळे शपथविधीवेळी पवार कुटुंबातील 'चार तोंडे चार दिशेला' होती, असे चित्र महाराष्ट्रासमोर गेले.
सत्तासंघर्षामुळे कुटुंबात फूट पडली, हे बरे नाही. काकांच्या डोळ्यादेखतच दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, अशी अच्छा अजित पवार यांनी त्यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. केवळ इच्छा व्यक्त करून ते थांबले नाही, तर शरद पवार यांच्याशी बोलून त्यांनी त्यासंदर्भातील पुढची पावले टाकायलाही सुरुवात केली. एकत्रिकरणाचा पहिला टप्पा म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या भूमिकेमुळे एकत्रिकरणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शरद पवार यांना हेतुपुरस्सर बाजूला ठेवून त्यांच्या हातात पक्षाची सूत्रे जाणार नाहीत, याची विशेष काळजी अजित पवार यांच्या पक्षातील 'आत्मकेंद्री नेत्यांनी' घेतली. या घटनेने शरद पवार यांच्या जवळील रोहित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे नाराज झाल्या. त्यांच्यापैकी एकही जण शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता.
advertisement
चार पवार-चार दिशेला
१) सुप्रिया सुळे- अजित पवार यांच्या निधनानंतर वहिनी सुनेत्रा पवार यांना सावरण्याचे काम सुप्रिया सुळे यांनी केले. घरात दु:खाचे वातावरण असताना संपूर्ण घराला आधार देण्याचे कामही सुप्रिया सुळे यांनी धीरोदात्तपणे केले. परंतु सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सुरू असतानाच सुप्रिया सुळे केंद्रीय अर्थसंकल्पाचे कारण सांगून नवी दिल्लीकडे रवाना झाल्या.
advertisement
२) रोहित पवार- अजित पवार यांनी जरी भाजपसोबत सत्तेची चूल मांडली होती तरी रोहित पवार हे त्यांच्या जवळ होते. रोहित पवार सांगतील ती कामे अजित पवार मंजूर करीत. परंतु अजित पवार यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिशय घाईत सुनेत्रा पवार यांना शपथविधीसाठी तयार केल्याने रोहित पवारही काहीसे नाराज झाल्याचे कळते. इकडे काकींचा शपथविधी सुरू असताना रोहित पवार यांनी फलटणचे तरडगाव गाठले. अजित पवार यांच्या सोबत सावलीसारखे असणारे विदीप जाधव यांचेही बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रोहित पवार तरडगावला गेले. काकींच्या शपथविधीची मुंबईत लगबग सुरू असताना रोहित पवार मात्र जाधव कुटुंबियांच्या सांत्वनाला गेल्याचा सूचक संदेश राज्यात गेला.
advertisement
३) पार्थ पवार- सुनेत्रा पवार या शपथविधीसाठी मुंबईत होत्या. शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय लगोलग होत असेलल्या शपथविधीला अनुकूल नसल्याचे खुद्द शरद पवार यांच्या बोलण्यातून समोर आल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी बारामतीमधील गोविंदबाग गाठली. जवळपास तासभर चर्चा करून त्यांनी शरद पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या चर्चेत अजित पवार यांच्या विलीनीकरणाच्या इच्छेवरही चर्चा झाली.
advertisement
४) सुनेत्रा पवार- अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता पक्षाचे काय? नेतृत्वासाठी कोण पुढे येणार? असे कोडे संपूर्ण महाराष्ट्राला पडले होते. परंतु महाशक्तीचे मार्गदर्शन आणि अजित पवार यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह यापुढे सुनेत्रा पवार यांनीही आढेवेढे न घेता नेतृत्वाची तयारी दाखवली. आपण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहोत, याची कल्पना त्यांनी शरद पवार वा त्यांच्या पक्षातील कुणाही नेत्यांनी दिली नाही.
advertisement
पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजितदादांच्या माघारीनंतरही जैसे थे!
शरद पवार यांनी भल्या सकाळीच पत्रकार परिषद घेऊन आपल्याला शपथविधीसंदर्भात कोणतीही माहिती नाही. अजित पवार यांच्या पक्षातील निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल घेत असावेत, असे सांगून पडद्यामागच्या घडामोडींना कोण कारणीभूत आहेत? या साऱ्या घडामोडी एवढ्या वेगात कशा घडल्या? याची उकल संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. पवार कुटुंब एकत्र यावेत, अशी अजित पवार यांची इच्छा होती, तीच आमचीही इच्छा आहे, असे सांगून त्यात खीळ घालणारे नेते कोण? हे देखील थेटपणे सांगून टाकले. मात्र महत्वाकांक्षी नेत्यांमुळे पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजित पवार यांच्या माघारीनंतरही तीव्र असेल, असेच सध्या तरी म्हणावे लागेल, असे राजकीय जाणकार सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 9:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Special Report: चार पवार-चार दिशेला, पवार घराण्यातील संघर्षाला अजितदादांच्या माघारीही धार!









