अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी? उज्ज्वल निकमांची मोठी प्रतिक्रिया, घातपातावरही केलं भाष्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. आता या विमान अपघातावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, पुराव्याशिवाय या घटनेला वेगळी कलाटणी देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
नेमका वाद काय?
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक प्रश्न उपस्थित केला होता. "विमान अपघातात आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मग घटनास्थळी केवळ पाच जणांचेच मृतदेह कसे सापडले?" असा सवाल मिटकरी यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे या अपघातामागे काही घातपात होता का? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं.
advertisement
उज्ज्वल निकम यांनी मांडली कायदेशीर बाजू
या सर्व शंकांचे निरसन करताना उज्ज्वल निकम यांनी अत्यंत परखड मत मांडले आहे. ते म्हणाले की, "अजितदादांच्या विमानात सहा प्रवासी होते, असे दर्शवणारा कोणताही अधिकृत पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही. अपघाताच्या वेळी विमानात इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन होते की, आगीमुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. अशा गंभीर परिस्थितीत विनाकारण संशय निर्माण करून घटनेला वेगळं वळण देणं चुकीचं आहे."
advertisement
'कट' सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज
अनेकांनी या अपघातामागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावर भाष्य करताना निकम यांनी सांगितले की, "जर कोणाला वाटत असेल की हा एखादा कट आहे, तर कायद्याच्या भाषेत तो सिद्ध करण्यासाठी प्राथमिक पुराव्यांची गरज असते. सध्या तरी असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे निष्कारण वावड्या उठवणं योग्य नाही."
advertisement
अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू आहे. या घटनेचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. मात्र, राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी? उज्ज्वल निकमांची मोठी प्रतिक्रिया, घातपातावरही केलं भाष्य







