Dharashiv Rain: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावांत पाणी शिरलं, अजित पवारांचा कलेक्टरसाहेबांना फोन
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात साकत येथे पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मुंबई : धाराशिव जिल्ह्यात साकत येथे पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
नागरिकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये याची खबरदारी घ्या
साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नागरिकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
संकट काळात राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे
advertisement
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे.पूरस्थितीमुळे धोक्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे,अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, नुकसान झालेल्या नागरिकांसोबत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Rain: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावांत पाणी शिरलं, अजित पवारांचा कलेक्टरसाहेबांना फोन