संग्रामवर 'महासंग्राम,' हिंदुत्वाची वात पेटवलेल्या फटाक्याची अजितदादांनी हवा काढली, बैठकीत काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sangram Jagtap: वारंवार समज देऊनही ऐकत नसल्याने वाचाळवीर संग्राम जगताप यांना थेट भेटायला बोलावून अजित पवार यांनी त्यांची शाळा घेतली.
मुंबई : विधानसभा निवडणूक सरताच विशिष्ट समाजाची मते आपल्याला पडली नाहीत, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास करण्याचे ठरवून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार असूनही 'हिंदू धोक्यात आहे' असे म्हणून राज्यात विविध ठिकाणी भाजप नेत्यांच्या समवेत संग्राम जगताप यांनीही सहभागी होऊन 'हिंदुत्वाचा नवा चेहरा' अशी ओळख निर्माण केली. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर अशी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण झाली. याच पार्श्वभूमीवर भूमिका जाणून घेण्यासाठी अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना भेटायला बोलावले.
सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागत असल्याने अखेर अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस धाडली. त्याआधीही संग्राम जगताप यांना वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवार यांनी समज दिली होती. मात्र समज देऊनही ऐकत नसल्याने जगताप यांना थेट भेटायला बोलावून अजित पवार यांनी त्यांची शाळा घेतली.
हिंदुत्वाची वात पेटवलेल्या फटाक्याची अजितदादांनी हवा काढली
advertisement
मुंबईतील वरळीत एका हॉटेलमध्ये अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष, आमदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याच बैठकीला संग्राम जगताप यांनाही बोलाविण्यात आले. पक्षाची विचारधारा सोडून तुम्ही जातीय तणाव निर्माण होईल, अशी विधाने करीत आहात. पक्षाला तुमची भूमिका अजिबात मान्य नाही, असे अजित पवार यांनी दरडावून संग्राम जगताप यांना सांगितले. तुमच्या भूमिकेमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जातोय, तेव्हा अध्यक्ष म्हणून मी हे सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वसमावेश आहे. पक्षात टोकाच्या विचारांना स्थान नाही. तुम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यावर तुम्ही द्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे यापुढील काळात आपल्या भूमिकेमुळे पक्षाच्या विचारसरणीला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घ्या असे अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना सांगितले.
advertisement
संग्राम जगताप यांना हिंदुत्वाची भुरळ कशी पडली? जहाल हिंदुत्त्ववादी नेते बनण्याचा भैय्यांचा प्रवास
पुरोगामी विचारांनी राजकारणात पदार्पण करणाऱ्या संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर शहरातले दिग्गज शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री अनिल भैय्या राठोड यांचे प्रस्थ मोडीत काढले. अनिल भैय्यांना पराभवाची धूळ चारणे भल्याभल्यांना जमली नाही, ती संग्राम जगताप यांनी करून दाखवली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप वेगळी लढल्याचा थेट फायदा संग्राम जगतापांना झाला होता. एकीकडे हिंदू मते विभागली गेली आणि एकगठ्ठा मुस्लिम मते त्यांच्या पारड्यात पडली होती. या अटीतटीच्या लढतीत ३ हजार ३१७ मतांनी संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांचा पराभव केला होता. अनिल भैय्या राठोड यांचा पराभव करून संग्राम जगताप पहिल्यांदा २०१४ साली आमदार म्हणून निवडून आले.
advertisement
यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा त्यांच्यासमोर शिवसेनेचे अनिल राठोड यांनी आव्हान दिले. यावेळीही संग्राम जगताप यांनी ११ हजार १३९ मतांनी अनिल राठोड यांचा पराभव केला. त्यावेळी सर्वसमावेश विचार घेऊन, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करूनच संग्राम जगताप निवडणुकीला सामोरे गेले होते.
मात्र २०२४ त्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी भाजपला साथ दिलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे मुस्लिम समाजाने जगताप यांना साथ देणे टाळले. असे असतानाही शरद पवार गटाच्या अभिषेक कळमकर यांना संग्राम जगताप यांनी जवळपास ४० हजार मतांनी पराभूत केले. २०२४ च्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी जगताप यांना मोठ्या संख्येने साथ दिली. मुस्लिम समाजाने मतदान केले नाही, अशी खंत किंबहुना तक्रार उघड बोलून दाखवत त्यावेळीपासून संग्राम जगताप यांनी मुस्लिमांविरोधात मोर्चा उघडला.
advertisement
खरे तर अहमदनगर शहर हा मतदारसंघ अनिल भैय्या राठोड यांच्यामुळे हिंदुत्त्वाचा बालेकिल्ला राहिला. आता त्यांच्या जाण्यानंतर प्रखर हिंदुत्त्ववादी भूमिका घेऊन, हिंदुत्वाचा प्रवास जोमाने सुरू ठेवून पुढचा काही काळ निवडून येण्याची गुंतवणूक जगताप करीत आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संग्रामवर 'महासंग्राम,' हिंदुत्वाची वात पेटवलेल्या फटाक्याची अजितदादांनी हवा काढली, बैठकीत काय घडलं?