राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मोझरी येथील गुरुकुंज नगरीत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता तीर्थ स्थापनेच्या विधीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा भक्तीमय प्रारंभ झाला.
अमरावती जिल्ह्यातील मोझरी हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. त्याठिकाणी महाराजांची समाधी आहे. दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी याठिकाणी साजरी केली जाते. यावर्षी सुद्धा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मोझरी येथे सुरू झाला आहे. सलग सात दिवस याठिकाणी मोठमोठे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. मोझरी येथील गुरुकुंज नगरीत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता तीर्थ स्थापनेच्या विधीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा भक्तीमय प्रारंभ झाला. याबाबत माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळचे प्रसार प्रमुख प्रकाश वाघ यांनी दिली.
श्री गुरुदेव सेवा मंडळचे प्रसार प्रमुख प्रकाश वाघ सांगतात की, पहाटेच्या मंद वाऱ्यात, शंखनाद आणि घंटानादाच्या निनादात हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत तीर्थ स्थापनेचा सोहळा पार पडला. तीर्थ स्थापनेनंतर सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. ध्यानानंतर संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली. “जय गुरुदेव” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेत विविध सामाजिक संघटनांनी व ग्रामविकास संस्थांनी सहभाग घेतला.
advertisement
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यातही होते योगदान- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रभक्ती, सामाजिक जागृती आणि ग्रामविकासाचा संदेश दिला. त्यांच्या “ग्रामगीता” या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण समाजाला विकासाचा मार्ग दाखवला. “सर्व धर्म समभाव” ही त्यांची शिकवण आजही समाजाला एकतेचा संदेश देते.
advertisement
5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार- दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यतिथी महोत्सवात धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धा, महिला संमेलन, हिंदी महानाट्य, अभंग गायन, पदवीदान समारंभ आणि बरेच असे कार्यक्रम घेण्यात घेण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून, विविध कीर्तन, प्रवचन, सामूहिक भजन, ग्रामविकास चर्चासत्रे आणि सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत.
advertisement
11 ऑक्टोबर रोजी देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मोझरी येथे येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. भक्तांच्या उपस्थितीमुळे गुरुकुंज नगरीत सध्या भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 ऑक्टोबर रोजी पारंपरिक गोपाल काल्याच्या सोहळ्याने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामविकास, आध्यात्म आणि सर्वधर्म समभाव यांचा संदेश देणारा हा महोत्सव पुन्हा एकदा तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार समाजामध्ये करणार आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
October 06, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन