Ashok Kharat Case: अशोक खरातचा विकृत चेहरा उघड! झोप उडवणारे ५ कारनामे, पाच एफआयआरमध्ये आहे तरी काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case: भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत आहेत. अशोक खरातविरोधात दाखल झालेल्या ५ एफआयआरमधील माहिती ही कोणत्याही संवेदशनशील माणसाची झोप उडवून देणारी आहेत.
नाशिक: नाशिकमधील लैंगिक शोषण, जादूटोणा प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत आहेत. अशोक खरातविरोधात दाखल झालेल्या ५ एफआयआरमधील माहिती ही कोणत्याही संवेदशनशील माणसाची झोप उडवून देणारी आहेत. आध्यात्मिक शक्ती आणि दैवी अवताराचा बनाव रचून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात या नराधमाचे पाशवी कृत्य समोर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात एकापाठोपाठ एक अशा तब्बल ५ एफआयआर (FIR) दाखल झाल्या.
जादूटोणा विरोधी कायद्यासह बलात्काराचे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ओकस प्रॉपर्टीजच्या नावाखाली चालणाऱ्या या 'काळ्या साम्राज्याचा' पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अशोक खरातची विकृतीच समोर आली आहे.
एफआयआर - १
तांब्याच्या बाटलीतील पाणी देऊन अत्याचार
नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ या दरम्यान ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे तक्रारदार महिलेला बोलावले. एकांतात कार्यालयात असताना खरातने तिला तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास दिले. त्याच वेळेस धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी महिलेसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले. यातूनच ती पीडित महिला गरोदर राहिली. ही बाब समोर आल्यानंतर खरातने तिला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. हा गर्भपात केल्यास तसेच जर अशोक खरातने सांगितल्या प्रमाणे धार्मिक विधीस नकार दिल्यास आयुष्यात वाटोळे होईल, मुलांचे बरेवाईट होईल असा दम खरातने दिला. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले असल्याची माहिती एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली.
advertisement
एफआयआर -२
धार्मिक विधीच्या नावाखाली बलात्कार...लघवीही पाजली
सरकारवाडा पोलिस ठाण्यात बीएनएस ६४ (१), ७४, ३५१ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्टव अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधाचा अधिनियम २०१३ चे कलम ३ (१) (२) नुसार दुसरा गुन्हा दाखल झाला. या एफआयआरनुसार, नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत खरातने त्याच ठिकाणी ओकस प्रॉपर्टीस कार्यालयात पीडित महिलेला बोलावलं. तक्रारदाराच्या पत्नीस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलावून तिचे पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या गुप्तांगात बोट घालून तिचेवर बलात्कार केला. त्याशिवाय, या प्रकरणाची वाच्यता केल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराचे अकाउंटवर पैसे घेतले. गिरगाव, ता. सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केला.
advertisement
एफआयआर -३
'माझ्यामध्ये दैवी शक्ती', म्हणत शरीराला स्पर्श केला
अशोक खरात विरोधात तिसरा गुन्हाही सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे तक्रारदार पीडित महिला व तिचे पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी अशोक खरात याने पतीस बाहेर पाठवले.
advertisement
त्यानंतर पीडित महिलेला एकटीला थांबवून, तिच्या हातावर एक काळा दगड फिरवून, तिच्या कानात मंत्र पुटपुटून, तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवला. त्याशिवाय, तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ''तू घाबरू नको, तू माझ्या आवारामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे. मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे. मी तुझी शुद्धी केली आहे. तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल'', असे सांगत दम दिला.
advertisement
एफआयआर -४
'मी देवाचा अवतार', नराधम अशोक खरातच्या थापा...
बीएनएस ६४ (१), ७४, ७५ ३५१ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याला प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम २०१३ चे कलम ३(१) (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलावत असे. पीडित महिलेला तांब्याचे भांड्यातील पाणी पिण्यास देऊन, पेढा खाण्यास देऊन, तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन, तिच्याशी शारीरिक लगट करून, तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही, असा दम दिला.
advertisement
एफआयआर -५
'मी शंकराचा अवतार... मला नकार दिला तर....,'खरातच्या पीडितेला धमक्या
पाचव्या एफआयआरनुसार, जुलै २०१४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीस बोलावून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल असे म्हटले. सर्पदंश होऊन त्यांचे जिवाचे बरेवाईटदेखील होईल अशी भीती दाखवली. ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात बोलावून, तिला मिठाई खाण्यास देऊन, तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून, कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने बलात्कार केला असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले. खरातविरुद्ध बीएनएस ६४(१), ७५ ३५१ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ (१) (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 10:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अशोक खरातचा विकृत चेहरा उघड! झोप उडवणारे ५ कारनामे, पाच एफआयआरमध्ये आहे तरी काय?








