E-Bus: केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच मिळाली मोठी भेट, छ. संभाजीनगरकरांचा प्रवास होणार सुखकर
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
E-Bus: स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत 2018 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर बससेवा सुरू झालेली आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेअंतर्गत 'स्मार्ट सिटी' हा प्रोजेक्ट चालवला जात आहे. याच प्रोजेक्ट अंतर्गत शहरासाठी सिटी बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. लवकरच या सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. केंद्र सरकारकडून छत्रपती संभाजीनगर शहराला 100 ई-बस मिळणार आहेत. त्यापैकी 35 ई-बस दिवाळीपूर्वी शहरात दाखल होणार आहेत. महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
जाधववाडी येथे बाजार समितीच्या पाठीमागील भागात स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासनाने भव्य बस डेपो उभारला आहे. दिवाळीपूर्वी येथे 35 ई-बस दाखल होणार आहेत. बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी (4 सप्टेंबर) मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कामाची पाहणी केली.
advertisement
स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत 2018 मध्ये शहर बससेवा सुरू झालेली आहे. 35 कोटी रुपये खर्च करून 100 डिझेल बस खरेदी केल्या गेल्या आहेत. बससाठी जाधववाडी परिसरात बस डेपो उभारण्यात आला आहे. याच बस डेपोच्या आवारात ई-बससाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महावितरणने हर्सूल वीज उपकेंद्रापासून बस डेपोपर्यंत एचटी लाइन टाकली आहे. एकाच वेळी 16 बसची चार्जिंग करता येईल.
advertisement
केंद्र शासनाने बससेवेसाठी हैदराबाद येथील एका खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. चालक आणि बस त्यांच्याच मालकीचे असतील. वाहक स्मार्ट सिटी प्रशासनाकडून नेमला जाईल. दिवाळीपूर्वी या ई-बस शहरात धावणार आहेत. नऊ व बारा मीटर लांब अशा दोन प्रकारच्या बस असतील. किलोमीटरमागे 64 रुपये कंपनीला द्यावे लागतील.
एकदा चार्ज केलेली बस 270 किलोमीटर चालते असा दावा खासगी कंपनीने केला आहे. पण, शहरातून ही बस 150 किलोमीटर रेंज देईल, असं गृहीत धरण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात बस चार्ज करण्यासाठी सिडको वाळूंज परिसरात एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सध्या एक ई-बस शहरात धावत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 05, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
E-Bus: केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच मिळाली मोठी भेट, छ. संभाजीनगरकरांचा प्रवास होणार सुखकर





