काळ्या रंगाच्या पोत्यात बॉडी भरली, Hyundai कारमध्ये... बार्शीमध्ये घरमालकिणीच्या दागिन्यांसाठी भाडेकरूचं भयानक कांड
- Published by:Prachi Amale
- Reported by:Pritam Pandit
Last Updated:
वयोवृद्ध घरमालकिणीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी टॉवेलने गळा आवळून भाडेकरूनेच मारल्याचे समोर आले आहे.
सोलापूर: बार्शी तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बार्शीत जुन्या विश्वासू भाडेकऱ्याने दागिन्यांसाठी चक्क घर मालकिणीचा खून केला आहे. बार्शीतील हांडे वस्ती येथे ही घटना घडली असून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. गंगुबाई कालिदास गडदे(वय 73,राहणार,हांडे गल्ली बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बार्शी पोलिसांनी चांगदेव गोवर्धन पाटील (वय 35,राहणार हत्तीज,जि सोलापूर ) याला वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेने सोलापूरात मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारामध्ये भाडेकरूचे आर्थिक नुकसान झाले होते. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. शेअर बाजारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वयोवृद्ध घरमालकिणीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी टॉवेलने गळा आवळून भाडेकरूनेच मारल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
गंगुबाई कालिदास गडदे या बार्शीतील हांडे गल्लीमध्ये आपल्या मालकीच्या वाड्यात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या वाड्यामध्ये सध्या अन्य दोन भाडेकरू चंद्रकांत सांगळे व महेश जामदारे हे राहत आहेत. भावाने अनेक दिवस कॉल करण्याचा प्रयत्न केला पण काही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तो 27 मार्च रोजी वाड्यावर पाहण्यासाठी गेला असता, 25 मार्चला गंगुबाई घराला कुलूप लावून निघून गेल्याची माहिती मिळाली. त्या नंतर परतल्याच नाहीत असे भाडेकरूंनी सांगितले. त्यानंतर भावाने बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
advertisement
सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरू
बार्शी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरू केला. यावेळी मेडिकलच्या फुटेजमध्ये गंगुबाई पिवळ्या रंगाची साडी नेसून जात असताना दिसल्या. त्यावेळी चांगदेव त्यांच्या पाठलाग करताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी चांगदेव पाटीलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने खून केल्याची कबुली केली. चांगदेवचे शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्याला पैशाची गरज होती. तसेच गंगुबाई यांच्या हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात डोरले, सोन्याचे वेल आणि फुले असल्याचे पाहून चांगदेवने कट रचला. सोने मिळवून त्यातून आर्थिक अडचण भागवण्याच्या उद्देशाने चांगदेवने 25 मार्च रोजी दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान गंगुबाई कालिदास गडदे हिला चांगदेव याचे राहते घरी बोलवले. त्यांना लिंबू सरबतमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यावर त्यांच्या नाकाला टॉवेलने दाबून त्यांचा खून केल्याचे कबुल केले.
advertisement
खून केला आणि कारमध्ये भरला
खून केल्यानंतर त्याने मृतदेह घरातील काळपट रंगाच्या पोत्यात भरून दुपारी हुंडाई कारने डिकीमध्ये नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी चांगदेव गोवर्धन पाटील यांच्या विरोधात वृद्ध गंगुबाईचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काळ्या रंगाच्या पोत्यात बॉडी भरली, Hyundai कारमध्ये... बार्शीमध्ये घरमालकिणीच्या दागिन्यांसाठी भाडेकरूचं भयानक कांड









