खासदार बजरंग सोनवणेंच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, 9 वर्षांपूर्वीचा कांड उघड
- Reported by:SURESH JADHAV
- Written by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या स्वीय सहाय्यकावर (पी.ए.) फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या स्वीय सहाय्यकावर (पी.ए.) फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खासदारांचे पी.ए. धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्या विरोधात बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेतेरा लाखांची फसवणूक
भरत नवनाथ खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय धसे यांनी त्यांना शेततलावाच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी धसे यांनी खेडकर यांच्याकडून पैसे घेतले होते. शेततलावाच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देतो आणि पार्टनरशिपमध्ये काम करू, असे सांगून धसे यांनी तक्रारदार भरत खेडकर यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही धसे यांनी ना टेंडर मिळवून दिले, ना घेतलेले पैसे परत केले.
advertisement
याबाबत वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर तक्रारदार भरत खेडकर यांनी पोलिसांत धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. ही घटना २०१६ मध्ये घडली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धनंजय धसे हे सध्या खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून दिल्ली येथे काम पाहत आहेत. खासदाराच्या स्वीय सहाय्यकावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. चकलांबा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत न्यूज १८ लोकमतने बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, धसे यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. ते आपले खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करत नसल्याचं सांगण्यात आलंय. मात्र कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता धनंजय धसे हे खासदार सोनवणे यांच्यासाठी मुंबई आणि दिल्लीत पीए म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली.
advertisement
मी तक्रारदार खेडकरांना ओळख नाही, मानहानीचा दावा टाकणार- धसे
या संपूर्ण प्रकरणाबाबत धनंजय धसे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, मी त्या संबंधित व्यक्तीला ओळखतही नाही. या गावाचं नाव सांगितले त्या गावी मी कधी गेलोही नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहाराचा संबंधच येत नाही. जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र आहे. संबंधित व्यक्ती विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मी बजरंग सोनवणे यांचा पीए किंवा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत नाही, अशी माहिती धनंजय धसे यांनी फोनवरून दिली.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 25, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खासदार बजरंग सोनवणेंच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, 9 वर्षांपूर्वीचा कांड उघड








