Beed News: बेपत्ता अल्पवयीन मुलीसोबत नको ते घडलं, देवस्थान परिसरातून ताब्यात, बीडमध्ये खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: 15 वर्षांची मुलगी 14 डिसेंबर रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोधाशोध केली.
बीड: गेल्या काही काळात गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आलेली 15 वर्षीय मुलगी अखेर पोलिसांच्या ताब्यात आली असली, तरी वैद्यकीय तपासणीत ती पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी 14 डिसेंबर रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोधाशोध केली. मात्र, कुठलाही मागमूस न लागल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी 17 डिसेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना मुलगी एका देवस्थानाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास येताच पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली.
advertisement
घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्ह्यातील कलमे अधिक कठोर केली आहेत. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यान्वयेही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी तरुणाने मुलीला फसवून पळवून नेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी गावातीलच 23 वर्षीय तरुण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 10:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News: बेपत्ता अल्पवयीन मुलीसोबत नको ते घडलं, देवस्थान परिसरातून ताब्यात, बीडमध्ये खळबळ










