ड्रोन, घेराव आणि तासभर झडती; ‘या’ गावाला 100 पोलिसांनी घेरलं, बीडमध्ये आता काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Beed News: गेल्या काही काळात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली.
बीड: गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे गेल्या काही काळापासून बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाढलेल्या लूटमारीच्या घटनांनी प्रवासी व वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडलेल्या चार लुटींच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेर या प्रकरणाचा छडा लावत बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली.
धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी येथे बीड पोलिसांनी सोमवारी सिनेस्टाइल कारवाई केली. लुटलेले 11 तोळे सोने व रोख रक्कम असा सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन ड्रोन, आरसीपी व 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
या कारवाईपूर्वी पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खामकरवाडी वस्तीची आधी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकी करण्यात आली. वस्तीतील हालचाली, घरांची रचना व पळवाटा यांचा अभ्यास झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास अचानक चोहोबाजूंनी घेराव घालण्यात आला. जवळपास तासभर पोलिसांनी घराघरात झडती घेतली. वाहनांच्या लांबच लांब रांगा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि आकाशात घिरट्या घालणारा ड्रोन यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
advertisement
बाप-लेकांना ताब्यात घेतलं
या प्रकरणात अनिल राम काळे आणि त्याची दोन मुले राहुल व विकास काळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या बापलेकांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली होती. त्यावेळी कारची काच न उघडल्याने ती फोडून आरोपींना बाहेर काढावे लागले होते आणि त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. चौकशीत चार लूटमारीचे गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच सोमवारी विशेष पथक खामकरवाडीत दाखल झाले होते.
advertisement
मुद्देमाल देण्यास टाळाटाळ
झडतीदरम्यान सुरुवातीला आरोपी मुद्देमाल देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच अखेर किचनमधील एका डब्याकडे बोट दाखवण्यात आले. तो डबा उघडताच त्यात मनी मंगळसूत्र, गंठन, सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा मोठा साठा आढळून आला. पंचांसमोर हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरात उपस्थित असलेल्या आरोपींच्या आईने ‘माझ्या मुलांना सोडा’ अशी विनवणी केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
advertisement
हल्ल्याचा धोका, 100 पोलिसांचा बंदोबस्त
view commentsही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. वस्तीतील संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन आरसीपीसह शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अद्याप तिघे साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे महामार्गावरील लूटमारीला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
December 17, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
ड्रोन, घेराव आणि तासभर झडती; ‘या’ गावाला 100 पोलिसांनी घेरलं, बीडमध्ये आता काय घडलं?









