बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित कांड, प्रेम प्रकरणातून तरुणावर सपासप वार, आधी भेटायला बोलवलं मग...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: पुन्हा एकदा बीड जिल्हा रक्तरंजित हत्याकांडाने हादरला आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील एका गावात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा रक्तरंजित हत्याकांडाने हादरला आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील एका गावात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं धारदार शस्त्राने शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तरुणाचा खून केला आहे.
भीमराव शिवाजी राठोड असं हत्या झालेल्या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी होता. तर अनिल चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. आरोपी अनिल चव्हाण याने घटनेच्या दिवशी भीमरावला भेटायला बोलावलं होतं. त्यानुसार भीमराव भेटायला गेला असता आरोपीनं त्याच्यावर धारदार कोयत्याने वार करत हत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात घरगुती आणि प्रेम प्रकरणाच्या संशयातून वाद होता. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. अनिल चव्हाण याने याच वादातून भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी, अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे भेटायला बोलावले. त्यांच्यात पुन्हा एकदा याच विषयावर जोरदार बाचाबाची झाली, जी नंतर हाणामारीत बदलली. यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल चव्हाणचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. भेटायला बोलावून एका तरुणाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 21, 2025 10:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित कांड, प्रेम प्रकरणातून तरुणावर सपासप वार, आधी भेटायला बोलवलं मग...








