“तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिलाय”, ठाण्यातील अल्पवयीन मुलीला बीडमध्ये आणलं, शेतातल्या घरात...
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Beed News: तिच्या परिस्थितीचा फायदा घेत एकाने तिच्याशी ओळख वाढवली. तसेच ‘तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिला आहे’ असे सांगत तिचा विश्वास जिंकला.
बीड: गेल्या काही काळात बीडमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. आता बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला बीडमध्ये नेत तिचा एका वयस्कर व्यक्तीसोबत जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पतीसह चार प्रमुख संशयित आणि संबंधितांविरोधात ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या काका-काकीकडे राहत होती. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत एकाने तिच्याशी ओळख वाढवली. तसेच ‘तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिला आहे’ असे सांगत तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी दोन अनोळखी व्यक्तींच्या मदतीने तिला गाडीत बसवून ठाण्याहून बीड जिल्ह्यात नेण्यात आले.
advertisement
बीड येथे पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीची ओळख पाटोदा तालुक्यातील एका वयस्कर व्यक्तीशी करून देण्यात आली. संबंधित व्यक्तीचे वय अधिक असल्यामुळे मुलीने लग्नास साफ नकार दिला. मात्र, आरोपींनी दबाव आणत 27 फेब्रुवारी रोजी तिचे लग्न जबरदस्तीने लावून दिले.
लग्न झाल्यानंतर मुलीला उंबरहीर परिसरातील शेतातील एका घरात ठेवण्यात आले. ती ज्या ठिकाणी राहत होती ते ठिकाण गावापासून दूर होते. तसेच तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तिला कोणाशीही संपर्क साधता येत नव्हता. 10 मार्च रोजी काही ओळखीचे लोक भेटायला आल्यानंतर तिने आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
advertisement
दरम्यान, सुरुवातीला सासरच्या लोकांनी तिला बाहेर सोडण्यास नकार दिला, मात्र, काही अटींवर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर तिने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
“तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिलाय”, ठाण्यातील अल्पवयीन मुलीला बीडमध्ये आणलं, शेतातल्या घरात...








