BJP Solapur : भाजपात 'इनकमिंग'वर बंडाचे निशाण! कार्यकर्त्यांचं थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Pritam Pandit
Last Updated:
Solapur BJP Protest : ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात अंतर्गत नाराजीचे सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
सोलापूर: भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून इतर पक्षातील नेत्यांकडून कमळ हातात घेतले जात आहे. मात्र, या इनकमिंगवरून भाजपातच धुसफूस सुरू झाली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात अंतर्गत नाराजीचे सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेच आज भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत यश मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून विरोधी पक्षांसह मित्रपक्षातीलही माजी लोकप्रतिनिधी, नेते, स्थानिक नेत्यांना पक्षाचे दरवाजे उघडले आहेत. आता याच इनकमिंगवरुन भाजपात धुसफूस सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला मात्र भाजपचे स्थानिक पदाधिकारी विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.
advertisement
भाजपचे स्थानिक नेते अप्पासाहेब मोटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत या पक्ष प्रवेशाचा जोरदार निषेध नोंदवला आहे. “घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे यांनी केली आहे.
या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष कार्यालयासमोर होणारे हे धरणे आंदोलन कोणत्या टप्प्यावर आणि कोणत्या वळणावर पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या उच्च पातळीवरून यावर मध्यस्थी होते का किंवा कार्यकर्त्यांची नाराजी वाढत जाते का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 21, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Solapur : भाजपात 'इनकमिंग'वर बंडाचे निशाण! कार्यकर्त्यांचं थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन