मुंबई महापालिका निवडणूक: मुंबईत १० हजार २३१ मतदान केंद्र, मतदानाची वेळ काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC Election : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
मुंबई : बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. सायंकाळी साडे पाच वाजताच्या पुढे मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याने त्याआधीच मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. साडे पाच वाजता जेवढे मतदार रांगेत उभे असतील त्यांना मतदार करता येईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
advertisement
१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
या निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मिळून एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालयांसह शासकीय / निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच खासगी इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे.
advertisement
मुंबईत १० हजार २३१ मतदान केंद्र
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच २३ मध्यवर्ती मतदान केंद्रानुसार एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्थापित करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकंदरीतच, मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व सोयीस्कर पार पडावी यासाठी विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपाच्या जागांमध्ये मतदान केंद्रांची व्यापक व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 10:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई महापालिका निवडणूक: मुंबईत १० हजार २३१ मतदान केंद्र, मतदानाची वेळ काय?










