बिल्डरांना उच्च न्यायालयाचा दणका! डीम्ड कन्व्हेयन्सबाबत दिला मोठा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Property Rules : गृहनिर्माण संस्थांच्या हक्कांबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई : गृहनिर्माण संस्थांच्या हक्कांबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. बिल्डरने गृहनिर्माण संस्थेच्या नावे डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजेच अभिहस्तांतरण करणे बंधनकारक आहे. असे स्पष्ट करत न्यायालयाने सदनिकाधारकांच्या हक्कांना प्राधान्य दिले आहे. बिल्डर आणि मूळ जमीनमालक यांच्यातील खासगी करारांपेक्षा वैधानिक तरतुदी अधिक प्रभावी असून,त्या पाळणे विकासकांवर बंधनकारक आहे. असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.
हा निकाल न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने दिला आहे. दहिसर आणि बोरिवली परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स देण्याच्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशाला परमानंद बिल्डर्स एलएलपी व अन्य विकासकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवण्यात आला होता, तो काल मंगळवारी २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला.
advertisement
बिल्डरांचा दावा न्यायालयाने फेटाळला
याचिकाकर्त्या विकासकांनी असा दावा केला होता की, मूळ करारांनुसार संबंधित गृहनिर्माण संस्थांना केवळ भाडेपट्ट्याचे अधिकार देण्यात येणार होते, जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे डीम्ड कन्व्हेयन्सचा आदेश चुकीचा असल्याचा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र न्यायालयाने हा दावा पूर्णपणे अमान्य केला. गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व सदनिका विक्री झाल्यानंतर विकासकाने किंवा जमीनमालकाने जमिनीवर किंवा इमारतीवर कोणताही अतिरिक्त हक्क राखून ठेवू नये, हा कायद्याचा मूळ उद्देश असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
advertisement
सदनिकाधारकांच्या हक्कांना प्राधान्य
न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, गृहनिर्माण प्रकल्प उभारताना जमीनमालक आणि बांधकाम करणारा विकासक हे दोघेही प्रवर्तकाच्या भूमिकेत येतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेला कायदेशीररीत्या जमीन आणि इमारतीचे हक्क हस्तांतरित करण्याची जबाबदारी या दोघांवरही समानपणे येते. खासगी करारांच्या आधारे सदनिकाधारकांचे हक्क मर्यादित करता येणार नाहीत, असेही न्यायालयाने ठाम शब्दांत सांगितले.
advertisement
डीम्ड कन्व्हेयन्सचे महत्त्व अधोरेखित
या निकालामुळे डीम्ड कन्व्हेयन्स ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून, ती सदनिकाधारकांच्या मालकी हक्कांचे संरक्षण करणारी अत्यंत महत्त्वाची कायदेशीर तरतूद असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अनेक ठिकाणी विकासक विविध कारणे पुढे करून अभिहस्तांतरणाची प्रक्रिया टाळतात किंवा विलंब लावतात. अशा परिस्थितीत हा निकाल गृहनिर्माण संस्थांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 10:18 AM IST










