Buldhana Crime : "तुझी चड्डी काढा लागते का?" शिक्षकाकडून भरवर्गात अपमान, चिठ्ठीत लिहित विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Buldhana Crime News : आई वडिलांवरून शिक्षक अपमानकारक बोलले, असं चिठ्ठीत लिहून ठेवत विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे.
Buldhana Crime News : शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
100 उठाबशा काढायला लावल्या
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. एवढ्यावरच न थांबता, शिक्षकाने विवेकच्या आई-वडिलांचाही अपमानास्पद उल्लेख करत "तुझी चड्डी काढायला लागते का?" असे म्हटले.
शिक्षकाला बेदम मारहाण
आई-वडिलांचा हा अपमान विवेकच्या जिव्हारी लागला. त्याने तात्काळ शाळा सोडून घर गाठले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच विवेकच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली. आपल्या मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या शिक्षक गोपाल सूर्यवंशीला संतप्त नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.
advertisement
चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय?
मी फाशी घेतो, कारण मला सुर्यवंशी मास्तर खुप बोलला. तो माझ्या आई-वडिलांना देखील खूप बोलला म्हणून मी फाशी घेतो, असं चिठ्ठीमध्ये लिहित चिमुरड्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाच्या तावडीतून शिक्षकाला सोडवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. शिक्षकाच्या अशा वर्तनामुळे आणि त्यातून विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळात आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
July 02, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : "तुझी चड्डी काढा लागते का?" शिक्षकाकडून भरवर्गात अपमान, चिठ्ठीत लिहित विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल