गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा स्थान मिळत असेल तर.... काकाच्या विरोधात पुतणीने रणशिंग फुंकलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढच्या दोन दिवसांत तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
बुलडाणा : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत तुतारी चिन्हावरच लढावे, अशी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे सांगत मी कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, असे उघडपणे शिंगणे यांनी सांगत काहीच दिवसांत पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत दिले. त्यांच्या निर्णयाविरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी भूमिका घेऊन काकांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढच्या दोन दिवसांत तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले असून पक्षप्रवेशाच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. मात्र शरद पवार गटाच्या नेत्या गायत्री शिंगणे यांनी काकांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
आम्ही एकनिष्ठांनी जायचं कुठं?
आम्हाला तयारीला लागा अशा सूचना शरद पवार यांनी केल्या. नंतर जर गद्दारी करणाऱ्या डॉ शिंगणे यांना पुन्हा पक्षात घेऊन जर उमेदवारी मिळत असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही एकनिष्ठांनी जायचं कुठं? शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास मी अपक्ष निवडणूक लढविणार असून मी माघार घेणार नाही, असा पवित्रा गायत्री यांनी घेतला आहे.
advertisement
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उमेदवारीला आमचा विरोधच राहणार
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उमेदवारीला आमचा विरोधच राहणार असून घरोघरी तुतारी पोहोचविण्याचे काम आम्ही एकनिष्ठपणाने केले, असे गायत्री शिंगणे म्हणाल्या. त्यामुळे सिंदखेडराजामध्ये काका पुतणीचा संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.
शिंगणे म्हणाले-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा 'तुतारी'वरच लढा!
शिंगणे म्हणाले, "आज संपन्न झालेल्या बैठकीत तुतारी चिन्हावर लढावे, अशी भावना मतदार कार्यकर्ते आणि जनतेची होती. मतदारसंघात फिरत असताना लोक मला तुतारी घेऊनच लढा, असा आग्रह धरत आहेत. समाजातल्या सगळ्याच घटकांचा मला आग्रह आहे. २९ तारीख शेवटची असल्याने ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे, म्हणून तातडीने आजची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे, या मताचा मी आहे"
advertisement
कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेणार-शिंगणे
view comments"आदरणीय शरद पवारांसोबत जाऊन निवडणूक लढवावी असे ९९ टक्के पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले. मी त्यांना सांगितलं मी केवळ मतदारसंघापुरता मर्यादित नाही. मी जिल्हाभरात जाऊन पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेईन. परंतु कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेऊ" असे शिंगणे म्हणाले.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
October 16, 2024 7:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा स्थान मिळत असेल तर.... काकाच्या विरोधात पुतणीने रणशिंग फुंकलं


