महाराष्ट्राच्या महिला सरपंचाने गावाचं रुपडचं पालटलं; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हातून होणार गौरव
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
महाराष्ट्रातील महिला सरपंचाने विकास कामे करत गावाचं रुपडं पालटलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी गौरव करणार आहेत.
चंद्रपूर, 14 ऑगस्ट: सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि दुर्द्रंम्य इच्छाशक्ती असल्यास सामान्य स्त्री देखील काय अचाट कामगिरी करू शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी घालून दिले आहे. कुठल्याही गावाच्या विकासासाठी सर्वार्थाने एका सक्षम नेतृत्वाची गरज असते. योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्यातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो. हे एका लहानशा खेड्यातील महिला सरपंचाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आज त्याच कार्याची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी घेतली असून या मुळे आज चंद्रपूर जिल्ह्याचे नाव पुन्हा देशात उंचावले आहे.
पंतप्रधानांनी घेतली कार्याची दखल
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यातील ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना दिल्ली येथील लाल किल्यावर सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून केवळ दोन सरपंचांची निवड झाली असून यातील लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम या एक आहेत.
advertisement
'असा' झाला कायापालट
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या तालुक्यातील सायगाटा आणि लाखापूर ही गट ग्रामपंचायत आहे. लाखापूर गावाची लोकसंख्या ही जेमतेम 528 असून त्यात 141 कुटुंब राहतात. गावाच्या बाजूला एक छोटा नाला आणि त्याबाजूला लागून विहीर आहे. मात्र विहिरीत पाणी कमी असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या टंचाईला सामोरे जावं लागतं असे. तर उन्हाळ्यात कोसो दूर वणवण फिरावे लागायचे. गावातील ही समस्या लक्ष्यात घेता चंद्रकला मेश्राम यांनी जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी नळ जोडणी करण्याचा संकल्प केला. तो संकल्प प्रत्यक्षात देखील आणला आहे. आज जल जीवन मिशन अंतर्गत गावात 141 पैकी 103 घरी नळ जोडणी करण्यात आली आहे. तर विहिरीत बोअर घेतल्यापासून पाणी मुबलक यायला लागले आहे. या सक्षम महिला सरपंचाच्या सक्षम आणि ठोस प्रयत्नाने आज संपूर्ण गाव जलयुक्त झाले असून कधीकाळी पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या गावात घरो घरी पाणी पोहचले आहे.
advertisement
15 ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधानाच्या हस्ते सत्कार
15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणि त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 14, 2023 3:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
महाराष्ट्राच्या महिला सरपंचाने गावाचं रुपडचं पालटलं; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हातून होणार गौरव