Plane Crash: 'विमानाचे 2 तुकडे झाले, धुरातून बाहेर पडलो अन् स्फोट झाला', छ. संभाजीनगरमधला 'तो' भयानक दिवस!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Plan Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. असाच एक अपघात 1993 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता.
छत्रपती संभाजीनगर : गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI 171 हे विमान 12 जून रोजी क्रॅश झाले. या विमानामध्ये 241 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 240 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. असाच भीषण विमान अपघात सन 1993 मध्ये छत्रपती संभाजी नगर शहरात देखील झाला होता. या विमान अपघातामध्ये देखील अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरमधील अपघातातून बचावलेले अनिल भालेराव यांनी लोकल18 सोबत बोलताना याबाबत सांगितले.
26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाइन्सची फ्लाइट नंबर 491, बोईंग 737 विमानाचा हा अपघात झाला होता. औरंगाबादहून मुंबईकडे रवाना होत असताना टेकऑफ दरम्यान विमान एका वाहनास धडकले आणि काही क्षणांतच दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात एकूण 118 प्रवासी व कर्मचारी होते, त्यापैकी 55 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. तर 63 जण जखमी झाले होते. दुर्घटनाग्रस्त विमानातून छत्रपती संभाजी नगर शहरातील अनिल भालेराव हे देखील प्रवास करत होते. परंतु, या भीषण अपघातातून ते सुखरुप बाहेर पडले होते.
advertisement
विमान जमिनीवर कोसळलं
अनिल भालेराव सांगतात की, “मी औरंगाबाद येथून मुंबईकडे कंपनीच्या कामानिमित्त जात होतो. दुपारी दीडच्या वेळेमध्ये आमच्या विमानाने टेकऑफ घेतलं, टेकऑफ घेतल्याच्या काही क्षणातच विमान कशाला तरी धडकल्याचं आम्हाला जाणवलं आणि काही कळण्याच्या आतच एक स्फोट झाला. त्यानंतर विमान परत हवेत गिरक्या घेऊ लागले. थोड्याच वेळात विमान पुन्हा कशाला तरी धडकले आणि जमिनीवर कोसळले. विमानातील पायलेटने त्यावेळी सांगितलं की, इमर्जन्सी आहे आणि आपल्याला विमान लँडिंग करावं लागेल.”
advertisement
धुराच्या लोटात आशेचा किरण
“एका शेतामध्ये हे विमान लँड झालं. विमान जेव्हा लँड झालं तेव्हा विमानाचे दोन तुकडे झाले. सर्वत्र धूर झाला आणि काहीच दिसत नव्हते. सर्वजण आरडाओरडा करत होते आणि काही क्षणात सर्वांचा आवाज येणे बंद झाले. कदाचित सर्वजण अन्कॉन्शियस झाले होते. सर्वत्र धूर असल्याने काही दिसत नव्हतं. मी खाली बसलो त्यानंतर समोर मला एक प्रकाश दिसला. त्या दिशेने मी गेलो आणि ते विमानाचा मुख्य दरवाजा होता. त्यातून कशीबशी खाली उडी मारली आणि मी बाहेर पडलो,” असं भालेराव सांगतात.
advertisement
विमानाचा स्फोट आणि सगळं संपलं
भालेराव पुढे सांगतात की, “विमानातून बाहेर आल्यानंतर विमानाचे दोन्ही कॅप्टन तिथं होते. त्यांनी आम्हाला विमानापासून लांब जाण्यास सांगितले. मी विमानापासून थोडा लांब गेलो आणि त्यानंतर लगेच विमानाचा मोठा स्फोट झाला. त्यात विमानात अडकलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. काही समजायच्या आत हे सगळं घडत होतं.”
विमान अपघाताचं कारण
छत्रपती संभाजीनगरमधील विमान दुर्घटनेस अनेक कारणे कारणीभूत ठरली. यात विमानाचं उड्डाण चुकीच्या दिशेनं झालं. उड्डाणाचा ट्रॅक लहान होता. त्यातच विमानानं झेप घेतल्यानंतर बाहेर एक ट्रक उभा होता. काही कळायच्या आत विमानाचे चाक त्या ट्रकला धडकले. त्यानंतर विमान हवेतच गिरक्या घेत होते. त्यानंतर विजेच्या तारेला जाऊन विमान धडकलं. त्यानंतर पुन्हा बाभळीच्या झाडाला विमानाची धडक झाली आणि विमान जमिनीवर लँड झाला. विमानाचे दोन तुकडे झाले आणि स्फोट झाला,” अशा आठवणी अनिल भालेराव सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 13, 2025 6:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Plane Crash: 'विमानाचे 2 तुकडे झाले, धुरातून बाहेर पडलो अन् स्फोट झाला', छ. संभाजीनगरमधला 'तो' भयानक दिवस!