Chhatrapati Sambhajinagar: चिमुकला खेळायला गेला, तो परतलाच नाही, छ. संभाजीनगरमधील संतपाजनक घटना
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होतोय.
छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता जागोजागी खड्डे करून ठेवलेले आहेत. अशाच एका 15 फूट खड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना देवळी परिसरातील माढा कॉलनी येथे बुधवारी घडली. या घटनेमुळे चिमुकल्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला तर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
ईश्वर संदीप भास्कर वय 3 राहणार देवळे परिसर असे खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मृत ईश्वरचे कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेश येथील आहे. वडील संदीप हे 12 वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असून त्यांना 3 मुले आहेत. ईश्वर हा सर्वात लहान मुलगा होता.
advertisement
नेमकं घडलं काय?
बुधवारी दुपारच्या सुमारास ईश्वर खेळण्यासाठी घराबाहेर पडला. घराबाहेर नेहमीच्या मुलांसोबत खेळत होता. बराच वेळ झाला तो घरी आला नाही. यामुळे त्याची आई रेखा यांनी ईश्वरचा शोध घ्यायला सुरुवात केली. ईश्वर हा मुलांसोबत खड्ड्याकडे खेळण्यासाठी गेल्याचे आईला कळाले. यामुळे रेखा या खड्ड्यापर्यंत गेल्या. यावेळी त्यांना ईश्वरचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसला. मृतदेह बघताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. रेखा यांनी घटनास्थळी टाहो फोडत खड्ड्यात उडी मारली. स्थानिकांनी रेखा यांना वाचवले. दरम्यान, ईश्वरला खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
advertisement
ईश्वरचा मृतदेह जेव्हा शवच्छेदनासाठी शहरातील घाटी रुग्णालयात देण्यात आला, तेव्हा ईश्वरचे वडील कोणी मदत करेल का? याकरिता फोन लावत होते. मुलाचा मृतदेह पाहणारी आई सुन्न झाल्या होत्या. तिच्या डोळ्यातील अश्रूदेखील कोरडे पडले होते. हुंदकादेखील बाहेर पडत नव्हता. दोघेही एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. “माझ्या मुलाचा जीव घेणारा खड्डा पाइप टाकून तत्काळ बुजवला असता तर त्याचा जीव वाचला असता. आता गुन्हा दाखल होईल, इतर सगळ्या बाबी होतील; पण माझा चिमुकला ईश्वर परत येऊ शकेल का,” असा सवाल मृत ईश्वरचे आई-वडील या वेळी विचारत होते.
advertisement
5 मोठ्या यंत्रणा तरीही बळी गेला
view commentsशहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम सुरू आहे. हैदराबादच्या जेव्हीपीआर कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मनपाचे या कामाकडे लक्ष आहे. स्वतंत्र चॉइस नावाची पीएमसीदेखील नेमण्यात आली आहे. शिवाय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कमिटी नेमण्यात आली आहे. काम कुठे थांबले तर पोलिसांची मदत घेतली जाते. एवढ्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणा, बडे अधिकारी या योजनेकडे लक्ष ठेवून आहेत. न्यायालयाच्या निगराणीखाली हे काम सुरू आहे. असे असतानादेखील हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. या घटनेवर नागरिकांतून संताप व्यक्त होत असून खड्डे बुजवण्याची मागणी होतेय.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 04, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: चिमुकला खेळायला गेला, तो परतलाच नाही, छ. संभाजीनगरमधील संतपाजनक घटना


