आईचे शब्द लागले जिव्हारी, संभाजीनगरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ. संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. आईचे शब्द जिव्हारी लागल्याच्या कारणातून तरुणीने जीवन संपवलं आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात घडली.
विशाखा अनिल वक्ते असं आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाखा ही नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती आणि तिचे वडील एका कंपनीत काम करतात. रविवारी संध्याकाळच्या वेळी विशाखा तिच्या राहत्या घरात टीव्ही पाहत होती. त्याचवेळी, आईने विशाखाला टीव्ही बंद करून अभ्यास करण्यास सांगितले. आईच्या या बोलण्याचा विशाखाला राग आला. आई स्वयंपाक घरात गेल्यानंतर आणि तिचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असताना, विशाखाने हे टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
रागाच्या भरात, विशाखाने घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिन्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली. विशाखाला बेशुद्धावस्थेत पाहून त्यांनी तातडीने तिला शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. विशाखाच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 16, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईचे शब्द लागले जिव्हारी, संभाजीनगरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन