संभाजीनगर: मुलगा नव्हे राक्षस, बापाची हत्या करून घरातच पुरला मृतदेह, आईलाही जीवे मारण्याची धमकी, आठ दिवसांनी...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ. संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने वडिलांचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला होता. मात्र मृतदेहातून उग्र वास येऊ लागल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली आहे.
राम काळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर कल्याण काळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथील रहिवासी असलेले कल्याण काळे हे पत्नी आणि अविवाहित मुले राम-लक्ष्मण यांच्यासह राहत होते. आरोपी मुलगा राम काळे आणि वडील कल्याण काळे यांच्यात नेहमीच किरकोळ कारणांवरून वाद होत असत. मिळालेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात रामने तीक्ष्ण हत्याराने वडिलांवर जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या केली.
advertisement
रामने हा प्रकार आपल्या भोळसर आईसमोर केला होता. मात्र त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीनं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह घराच्या आतच खड्डा खोदून पुरला आणि त्यावर माती टाकली.
उग्र वासामुळे झाला खुलासा
मृतदेह घरात पुरल्यामुळे आठ दिवसांनंतर तो कुजून परिसरात अत्यंत उग्र वास येऊ लागला. यानंतर आरोपीच्या आईने हिंमत दाखवून या घटनेची माहिती आपल्या दिराला दिली. यानंतर त्यांनी तत्काळ गावचे सरपंच संभाजी तवार यांना माहिती दिली. सरपंच तवार यांनी जराही वेळ न घालवता पाचोड पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने कडेठाण येथे धाव घेतली. पोलिसांनी घरात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. यावेळी वैद्यकीय पथकाला बोलावून मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ आरोपी मुलगा राम काळे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 23, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगर: मुलगा नव्हे राक्षस, बापाची हत्या करून घरातच पुरला मृतदेह, आईलाही जीवे मारण्याची धमकी, आठ दिवसांनी...


