शरद पवारांच्या खासदारकीमुळे शिवसेनेत नाराजी? तोफेच्या तोंडी संजय राऊत? खासदारांनी घेरलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठा वाद निर्माण झाल्याची इनसाईड स्टोरी समोर येतेय. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदीनी शरद पवारांच्या खासदारकीवरून संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांवर संताप व्यक्त केला.
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सतत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवांमुळे पक्षातही खटके उडायला सुरुवात झालीय. अंतर्गत मतभेदांनी आधीच पक्षात उभी फूट पडली आता पुन्हा नव्या गटबाजीची चर्चा सुरु झालीय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंटर पॉईंटला आहेत पुन्हा संजय राऊत.
ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठा वाद निर्माण झाल्याची इनसाईड स्टोरी समोर येतेय. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदीनी शरद पवारांच्या खासदारकीवरून संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांवर संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या झेडपी निवडणुकीत आदित्य ठाकरे सक्रीय नव्हते, असा मुद्दाही खासदारांनी उपस्थित केला. तर या अफवा असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील सुंदोपसुंदीवरून जोरदार टोले लगावले.
advertisement
राज्यसभेच्या जागेवरून बैठकीत वादाची ठिणगी
उद्धव ठाकरेंनी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. बैठकीतील इनसाईड स्टोरी उद्धव ठाकरेंच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. मविआला मिळालेल्या राज्यसभेच्या जागेवरून बैठकीत वादाची ठिणगी पडली. मुंबईतील बैठकीत काय काय घडलं?
प्रियांका चतुर्वेदी यांचा बैठकीदरम्यान आक्षेप, थेट राऊतांवर हल्ला
राज्यसभेची जागा देण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यावर तुम्ही राष्ट्रवादीशी बोला अशी भूमिका घेतली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्याच वेळी प्रियंका चतुर्वेदींनी आक्षेप घेतला. I want to protest. Why is sanjay raut giving a statement about sharad pawar? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी,“ते बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे.शेवटी निर्णय मीच घेणार” असं म्हणत संजय राऊत यांची बाजू घेतली. तर '6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला?' असा प्रश्न मराठवाड्यातील खासदारानं उपस्थित केला.
advertisement
आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत का नाहीत?
बैठकीतील नाराजीची मालिका इथंच संपली नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून कोणतीच मदत मिळाली नाही, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, शिवसैनिक नाराज आहेत. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्या बैठकीत आदित्य ठाकरे रागात होते?
प्रकृतीमुळे उद्धव ठाकरेंवर मर्यादा आहेत. मात्र आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत, असा मुद्दा संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. परिणामी मुंबईतील बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी फारसा संवाद साधला नाही. ते जरा रागात होते, असं देखील एका खासदारानं सांगितलं.
advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेनं जिद्दीनं लढवली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत लागणारी आर्थिक ताकद आणि मोठं पाठबळ देऊ शकत नसल्यामुळे आदित्य ठाकरे सक्रीय झाले नसतील, असे राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख म्हणाले.
...तरच ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय फायदा
advertisement
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात निर्माण झालेले मतभेद उद्धव ठाकरेंना विचार करायला लावणारे आहेत. राज्यभर फिरून नागरिकांशी संवाद साधणं, शिवसैनिकांच्या भावना समजून घेत पक्ष बळकट करणं हे काम ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंना प्रकृतीमुळे मर्यादा आहेत. मात्र आदित्य ठाकरे जो पर्यंत मुंबई सोडून राज्यभर फिरणार नाहीत, गावपातळीवरील शिवसैनिकाला बळ देणार नाहीत तो पर्यंत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार नाही. परिणामी आदित्योदय होऊन त्याची किरणं राज्यभर पसरली तरच ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय फायदा होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 9:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांच्या खासदारकीमुळे शिवसेनेत नाराजी? तोफेच्या तोंडी संजय राऊत? खासदारांनी घेरलं









