शिवभक्त शेतकरी! 50 लाखांचा बंगला बांधला, त्यावर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सध्या धाराशिवमधील एका शिवभक्त शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांनी आपल्या शेतात 50 लाखांचा बंगला बांधला असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: छत्रपती शिवाजी महाराज यांना अखंड महाराष्ट्राचं दैवत मानलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि अगदी गावांमध्येही शिवरायांचे पुतळे पाहायला मिळतात. मात्र, सध्या धाराशिवमधील एका शिवभक्त शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा आहे. कोरडवाहू शेतकरी भागवत शितोळे यांनी आधुनिक शेतीची कास धरली आणि शेतातून चांगले उत्पन्न मिळवले. शेतीच्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या शेतातच 50 लाखांचा बंगला बांधला. विशेष म्हणजे या बंगल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 फूट उंच आणि 10 फूट लांब असा अश्वारुढ पुतळा उभारला आहे.
advertisement
शितोळे कुटूंब हे मुळचं शेतकरी असून कळंब तालुक्यातील नायगाव येथे त्यांची 15 एकर कोरडवाहू शेती होती. संपूर्ण कुटूंब उच्चशिक्षित असलं तरी नोकरी नव्हती. कोरडवाहू शेती असल्याने उत्पन्नाचं साधन नव्हतं. तेव्हा भागवत शितोळे यांनी आधुनिक शेतीचा मार्ग पत्करला. आपल्या शेतात जरबेरा, ऊस आणि इतर नगदी पिके घेतली. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. परिस्थिती बदलली आणि त्यांनी आपल्या शेतात बंगला बांधण्याचा निर्णय घेतला.
advertisement
शेतात बांधला 50 लाखांचा बंगला
भागवत शितोळे यांना सचिन व दत्ता शितोळे ही दोन मुले आहेत. शेतातून चांगलं उत्पन्न मिळाल्याने त्यांनी आपल्या शेतातच अलिशान बंगला बांधण्याचं ठरवलं. त्यानुसार जवळपास 50 लाखांचा खर्च करून बंगला बांधला. पण याचवेळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं. या आंदोलनातून प्रेरणा घेत त्यांनी घरावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पुतळा अनावरण केल्यानंतरच गृहप्रवेश
संपूर्ण शितोळे कुटूंब शिवभक्त असून दरवर्षी ते आवर्जून रायगडला जातात. आपल्या नव्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार नांदेडचे मूर्तिकार श्रीकृष्ण बालाजी शिंदे यांच्याकडून 11 फूट उंच आणि 10 फूट लांब छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवून घेतला. त्यासाठी त्यांना जवळपास 8 लाखांचा खर्च आला. विशेष म्हणजे शितोळे कुटुंबियांनी पुतळ्याचं अनावरण करूनच गृहप्रवेश केला.
advertisement
दरम्यान, शितोळे कुटुंबाने आपल्या बंगल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पंचक्रोशितच नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावरही या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Aug 27, 2024 2:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
शिवभक्त शेतकरी! 50 लाखांचा बंगला बांधला, त्यावर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला!










