धाराशिवमध्ये पैसे वाटप प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल, ओमराजे पोलिसांवर संतापले, थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिवमध्ये मतदान करण्यासाठी पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : आज लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मात्र याचदरम्यान जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मतदान करण्यासाठी पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात खरोसा गावातील माजी सरपंच प्रशांत डोके, तनुजा शेळके, इंदुबाई गुंजेटे, बालाजी गुंजेटे, प्रशांत डोके अशा चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
भारतीय दंड विधान संहिता कलम 171 व लोकप्रतिनित्व कायदा कलम 123(1) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद केल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांचा याच मुद्द्यावरून लातूरचे पोलीस अधीक्षक आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत फोनवरून वाद झाला आहे.
advertisement
या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानं ओमराजे निंबाळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत लातूरचे पोलीस अधीक्षक आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून जाब विचारला. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे प्रकरण गंभीर असताना अदखलपात्र गुन्हा कसा नोंद केला असा सवाल ओमराजे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान त्यानंतर जिल्हाकारी सचिन ओम्बासे यांच्याकडून या प्रकरणात पोलीस कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्याचे अश्वासन ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
May 07, 2024 10:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवमध्ये पैसे वाटप प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल, ओमराजे पोलिसांवर संतापले, थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन