उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदेंचा चष्म्यावर हात, नजरानजर टाळली, भाईंचं अवघडलेपण दिसलं, फोटोसेशनवेळी काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Uddhav Thackeray Photo Eknath Shinde: उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांना आपल्या चष्म्यावर हात ठेवत उद्धव ठाकरे यांच्याशी नजरानजर टाळली. ठाकरे यांनीही शिंदेंकडे न पाहता तसेच त्यांच्या शेजारीही न बसता त्यांच्यापासून दूर असलेल्या खुर्चीवर बसणे पसंत केले.
मुंबई : शिवसेना फुटीनंतर तब्बल तीन वर्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर आले. निमित्त होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सभागृहातील निवृत्तीचे.. ठाकरे आणि शिंदे आधी विधान परिषद सभागृहात एकमेकांसमोर आले आणि काही वेळातच निवृत्त विरोधी पक्षनेत्यांसोबत क्षणचित्रे कैद करण्यासाठी सगळे मान्यवर जमलेले असताना ठाकरे शिंदेंही समोरासमोर आले. परंतु उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांना आपल्या चष्म्यावर हात ठेवत उद्धव ठाकरे यांच्याशी नजरानजर टाळली. ठाकरे यांनीही शिंदेंकडे न पाहता तसेच त्यांच्या शेजारीही न बसता त्यांच्यापासून दूर असलेल्या खुर्चीवर बसणे पसंत केले. उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे हे अवघडलेले दिसून आले.
नेमके काय घडले?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असल्याने साहजिक दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आज दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांच्या भाषणानंतर प्रथा परंपरेप्रमाणे निवृत्त सदस्य तसेच विरोधी पक्षनेत्यांसोबत फोटो काढतात. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ज्येष्ठ मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
advertisement
क्षणचित्रे टिपण्यासाठी सर्वजण तयार असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एन्ट्री झाली. तोपर्यंत पहिल्या रांगेतील खुर्चांवर नेतेमंडळी विराजमान झाली होती. आधी चंद्रकांत पाटील आपल्या खुर्चीवरून उठले आणि उद्धव ठाकरे यांना आसनस्थ होण्याची विनंती केली. परंतु ज्येष्ठ मंत्री असल्याने उद्धव ठाकरे यांनी प्रांजळपणे आपण बसा, अशी विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्या रांगेतून अगदी शेवटाकडे जायला निघाले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांसोबत बसण्याची विनंती केली. परंतु उद्धव ठाकरे यांनी न ऐकता रांगेच्या शेवटी जाणे पसंत केले. दरम्यान उद्धव ठाकरे तेथून जाताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पाहण्याचे टाळले. उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या चष्म्याच्या फ्रेमवर हात ठेवून नजरानजर टाळली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसणेही उद्धव ठाकरे यांनी टाळले. अखेर ते बावनकुळे यांच्या खुर्चीवर बसले. त्यांच्या शेजारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बसल्या होत्या. दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. फोटोसेशन आटोपताच उद्धव ठाकरे हे माध्यम कक्षात प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यासाठी निघाले. परंतु त्याआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांना टाळलेले असले तरी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अजिबात टाळले नाही....!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदेंचा चष्म्यावर हात, नजरानजर टाळली, भाईंचं अवघडलेपण दिसलं, फोटोसेशनवेळी काय घडलं?