मी फोन केला, उदय सामंतांना अमरावतीला धाडले.... बच्चू कडू यांनी आंदोलन मागे कसे घेतले? एकनाथ शिंदे यांनी स्टोरी सांगितली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bacchu Kadu: राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : शेतकरी कर्जमाफीसाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. आपल्या २० पेक्षा अधिक मागण्या सरकारने मान्य केल्या असून कर्जमाफीची तारीख २ ऑक्टोबरच्या आधी जाहीर करावी नाहीतर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
बच्चू कडू यांनी जसेही उपोषण मागे घेतले तसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मी संपर्क करून त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मी बच्चू कडू यांना फोन केला, उदय सामंत यांना धाडले...
एकनाथ शिंदे म्हणाले, बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे हे आंदोलन थांबविण्यासाठी मी त्यांना संपर्क साधला. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांचे मी आभार मानतो. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहे. त्यामुळे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या.
advertisement
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला वेळ हवा आहे. त्यासाठी एक समिती गठित करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. समितीच्या अहवालानुसार शासन कर्जमाफीसंबंधी पुढील पावले उचलेल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांच्या उपोषणावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
प्रहार संघटना आणि इतरही संघटनांच्या वतीने शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी बच्चू कडू आंदोलनाला बसले होते. कालही मंत्री संजय राठोड, मंत्री बावनकुळे यांनी विनंती केली होती. आज मी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उदय सामंत यांना बच्चू कडू यांच्याकडे धाडले. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, यासाठी मी त्यांना फोन केला. उदय सामंत यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन त्यांनी उपोषण थांबवले. मी बच्चू कडू यांना धन्यवाद देतो, असे शिंदे म्हणाले.
advertisement
बच्चू कडू यांच्याकडून सातव्या दिवशी उपोषण मागे
बच्चू कडू यांचे मागील ७ दिवसापासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण सुरु होते. सहा दिवसांच्या आंदोलनानंतर महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत कर्जमाफीबद्दल आश्वासन दिले तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा पाहून शासनाने उद्योगमंत्री उदय सामंत यांना बच्चू कडू यांना चर्चा करण्यासाठी पाठवले. शनिवारी उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तुमच्या मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचे सांगत दिव्यांगांच्या मानधनवाढीवर येत्या ३० जून रोजी निर्णय घेणार असल्याचे सांगून शेतकरी कर्जमाफीबद्दल समिती स्थापन करू, असे शासनाने मान्य केले असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 14, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी फोन केला, उदय सामंतांना अमरावतीला धाडले.... बच्चू कडू यांनी आंदोलन मागे कसे घेतले? एकनाथ शिंदे यांनी स्टोरी सांगितली