भाजपकडून पक्षप्रवेशांचा सपाटा, 'त्या' नगरसेवकाच्या हातात कमळ, एकनाथ शिंदे यांच्याकडून खिल्ली
- Published by:Akshay Adhav
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेशाचा सपाटा सुरू आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतायेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व देखील पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशासाठी आसुललेले आहे. पक्ष प्रवेश करून घेताना मागे पुढे न पाहता पदाधिकारी कार्यालयात आला की भाजपचा दुपट्टा घाल, असा सपाटाच पक्ष नेतृत्वाकडून लावण्यात आला आहे. याचीच खिल्ली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उडवली आहे.
डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश करवून घेतला होता. त्यावरून शिवसेनेने आता रविंद्र चव्हाण यांचे व्यंगचित्र काढून समाज माध्यमांवर वेगाने पसरवले आहे.
...त्यांनी ओढून गळ्यात पट्टा घातला!
भाजी घ्यायला यांच्या कार्यालया शेजारी जात होतो, यांनी ओढून गळ्यात पट्टा घातला, अशा आशयाचे व्यंगचित्र काढून शिवसेनेने समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. हे व्यंगचित्र काढून शिवसेनेने एकप्रकारे भारतीय जनता पक्षाला डिवचले आहे. पक्षप्रवेशाचे उपहासात्मक व्यंगचित्र काढून शिवसेनेने रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
advertisement
म्हणून महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, शिंदेसेनेचा गंभीर आरोप
भाजपाने महेश पाटील यांना जेलमध्ये टाकले होते. तेव्हा पाटील परिवाराने एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली. शिंदे यांनीही मदत केली. यामुळे महेश पाटीलने जेल बाहेर येताच शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही महेश पाटील पक्षात सक्रीय नव्हते. त्यांनी कल्याण ग्रामीण मधून आमदारकीची उमेदवारी मागितली, ती शिवसेनेने नाकारली. यामुळे महेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे यांच्या विरोधात काम केले. शिवसैनिक उघडपणे बोलत होते. तीच नाराजी म्हणून महेश पाटील तेव्हा पासून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्याच महेश पाटील यांनी ५ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला, असे गंभीर आरोप शिंदे यांच्या शिवसेनेने केले.
advertisement
शिवसेना भाजपमध्ये पक्षप्रवेशांवरून संघर्ष, शिवसेनेने थेट कॅबिनेटवरच बहिष्कार टाकला
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमधला संघर्ष उफाळून आलाय. एकमेकांच्या पक्षातील माणसांनाच फोडूनच पक्षप्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे त्या त्या पक्षांनी जुळवलेले गणित निवडणुकीआधी फिस्कटून गेले आहे. सेना मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने सेना-भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे.
advertisement
सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदी मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. त्यावर उल्हासनगरमध्ये तुम्ही आधी सुरुवात केली, असे सांगत सेना मंत्र्यांची तोंडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी गप्प केली.
उल्हासनगरमध्ये आधी तुम्ही सुरुवात केली. तुम्ही केले ते चालतं, आम्ही केलं ते वाईट असतं. असं कसं चालेल? नियम दोन्ही पक्षांनी पाळले पाहिजेत. एकट्याने नियम पाळून चालणार नाही, अशा शब्दात शिवसेना मंत्र्यांना सुनावत आतापासून दोन्ही पक्षांनी नियम पाळावेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 6:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपकडून पक्षप्रवेशांचा सपाटा, 'त्या' नगरसेवकाच्या हातात कमळ, एकनाथ शिंदे यांच्याकडून खिल्ली


