Gondia : लहान मुलांच्या जीवाशी खेळ! पोषण आहाराच्या पाकिटात आढळला मेलेला उंदीर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
धवलखेडी अंगणवाडीत वाटप केलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. मधुकर दिहारी यांनी सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात संतापाचे वातावरण.
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील एका अतिदुर्गम भागातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आदिवासी बालकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप यानिमित्ताने पुन्हा दिसून आला. देवरी तालुक्यातील धवलखेडी येथील अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये चक्क मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोषण आहारात 'मृत उंदीर'
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत (ICDS) ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी हा पोषण आहार (मल्टी मिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन्स) घरपोच वाटप केला जातो. धवलखेडी येथील एका लाभार्थ्याच्या घरी हे खाऊचे पाकीट पोहोचले. घरी गेल्यानंतर जेव्हा पालकांनी पाकीट उघडून पाहिले, तेव्हा आतमध्ये मेलेला उंदीर आढळला. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. जो आहार लहान मुलांना पौष्टिक प्रोटीन देण्यासाठी दिला जातो, त्याच आहारात असा जीवघेणा प्रकार समोर आल्याने स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
आदिवासी नेत्याचा थेट इशारा
घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी शासन आणि प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. या संदर्भात आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिहारी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

आदिवासी नेते मधुकर दिहारी यांनी दिली प्रतिक्रिया
"जर अशा पद्धतीने आदिवासी भागातील निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अन्यथा याविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल."
advertisement
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या पोषण आहाराची गुणवत्ता आणि साठवणुकीची पद्धत तपासावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण हा केवळ एकटा पाकीट नसून, अशाच प्रकारचा आहार अनेक बालकांना वाटप करण्यात आला असण्याची भीती पालकांना सतावत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gondia : लहान मुलांच्या जीवाशी खेळ! पोषण आहाराच्या पाकिटात आढळला मेलेला उंदीर