कल्याण: आधी राहुल गांधींचा फोन, आता साडी नेसवलेल्या काँग्रेस नेत्याला सपकाळांनी घेतलं खांद्यावर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून अपमानजनक वागणूक देणाऱ्या काँग्रेस नेत्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं.
काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका ७२ वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केला होता. प्रकाश उर्फ मामा पगारे असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फोन करून पगारे यांचं मनोबल वाढवलं होतं.
यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मामा पगारे यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे. त्यांनी थेट ७२ वर्षीय मामा पगारे यांना खांद्यावर घेतलं. ते पगारे यांना खाद्यावर घेऊन व्यासपीठावर गेले. याबाबतचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. ज्यात हर्षवर्धन सपकाळ पगारे यांना खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत.
advertisement
ज्यावेळी सपकाळ यांनी पगारे यांना खांद्यावर घेतलं, त्यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी केली. "काँग्रेस पक्षाचा विजय असो", "सपकाळ साहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", "मामा पगारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा प्रकारची घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सपकाळ यांनी पगारे यांना खांद्यावर घेऊन पगारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला.
advertisement
भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवलेले काँग्रेस नेते मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळांनी घेतलं खांद्यावर pic.twitter.com/0ppES4lvy1
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2025
नेमकं प्रकरण काय घडलं होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ७२ वर्षीय काँग्रेस नेते मामा पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसण्यास भाग पाडलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ काढून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पगारे यांनी कथितपणे पंतप्रधानांचे अपमानजनक छायाचित्र शेअर केल्यानंतर भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. मंगळवारी (२३ सप्टेंबर) भाजप कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांच्याकडे जाऊन त्यांना साडी नेसवली होती.
advertisement
मी फक्त पोस्ट फॉरवर्ड केली होती - पगारे
साडी नेसवल्याच्या प्रकारानंतर मामा पगारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "मी फक्त पोस्ट फॉरवर्ड केली होती. २२ तारखेला मला साडेचार- पाच वाजता फोन आला आणि मी कुठे आहे, असे विचारले. त्यांना मला भेटायचे होते. मी सांगितले की मी आज नाही तर उद्या येईन. आज, मी त्यांना सांगितले की मी रुग्णालयात आहे. तेव्हा त्यांनी आम्ही रुग्णालयात येतो, दोन मिनिटांचं काम आहे, असं सांगितलं. मी रुग्णालयातून खाली येत असताना भाजप जिल्हाध्यक्ष आणि १०-१२ जणांनी मला पकडले आणि विचारले, 'मोदीजींविरुद्ध पोस्ट करण्याची तुझी लायकी आहे का? असं म्हणत त्यांनी साडी नेसवली," अशी माहिती पगारे यांनी दिली होती. आता सपकाळ कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर असताना पगारे यांना खांद्यावर उचलून घेतलं. ही आता चर्चेचा विषय ठरत आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 11, 2025 12:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कल्याण: आधी राहुल गांधींचा फोन, आता साडी नेसवलेल्या काँग्रेस नेत्याला सपकाळांनी घेतलं खांद्यावर