15 वर्षांनंतर ईशाच्या चेहऱ्यावर 'मुस्कान', वर्ध्यातून गायब झालेली मुलगी हरियाणामध्ये कशी सापडली?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
तब्बल 15 वर्षांनंतर वर्ध्याच्या ईशाला तिचं घरं गवसलं आहे. वयाच्या 8 व्या वर्षी निघून गेलेली ईशा 22व्या वर्षी तिच्या घरी परतणार आहे.
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा : तब्बल 15 वर्षांनंतर वर्ध्याच्या ईशाला तिचं घरं गवसलं आहे. वयाच्या 8 व्या वर्षी निघून गेलेली ईशा 22व्या वर्षी तिच्या घरी परतणार आहे. वर्ध्यातील दयाल नगर भागात राहणाऱ्या अनिकेत ढोके याची आई त्याच्या वयाच्या 8व्या वर्षी बहिणीला घेऊन निघून गेली होती, तेव्हापासून त्याने आई आणि बहिणीचा शोध घेणं सुरूच ठेवलं. आई तर अजूनपर्यंत भेटली नाही, पण 15 वर्षांनंतर हरियाणाच्या एका आश्रम शाळेत आपली बहिण असल्याची माहिती अनिकेतला मिळाली आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
घरातून गायब कशी झाली ईशा?
बहीण-भावांचं नातं हे एकमेकांसाठी जीव का प्राण असतं, अशात हरवलेलया बहिणीची आशा घेऊन लहानाचा मोठा झालेल्या अनिकेतला ऑपरेशन मुस्कानमुळे आपली बहीण गवसली आहे. 26 वर्षांचा अनिकेत शिकला आणि त्यानंतर नोकरीलाही लागला. शिक्षण घेत असताना 2010 हे वर्ष अनिकेतसाठी कधीही विसरता येणार नाही, असं ठरलं. वडील दारू पित असल्यामुळे आईने 8 वर्षांच्या ईशाला घेऊन घर सोडलं, त्यानंतर अनिकेतने या दोघींना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, काकांनी वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली, ही तक्रार 15 वर्षांनी कामी आली.
advertisement
सोनीपतच्या आश्रमात वास्तव्य
आपली बहीण आज ना उद्या मिळेल, अशी आशा अनिकेतला होती, यासाठी त्याने सतत शोधही घेतला, त्याच्या या प्रयत्नांना यश आलं. हरियाणाच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे पंचकुलाचे एएसआय राजेश कुमार सोनीपत मधल्या बालग्राम आश्रमात कामानिमित्त गेले होते, त्यावेळी ईशा नावाच्या मुलीने त्यांच्याकडे आपल्या आई-वडिलांचा शोध घेण्याची विनंती केली, त्यानंतर ईशाचे समुपदेशन करण्यात आलं, तिला तिच्या घराबाबत, आई-वडिलांबाबत, गावाबाबत विचारलं, पण तिला यातलं फारसं काही आठवत नव्हतं.
advertisement
आपल्या घराजवळ रेल्वे स्टेशन आहे आणि बाबांचं नाव चिंधू असल्याची आठवण तिला होती. यानंतर एएसआय राजेश कुमार यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या 2010 मधील मिसिंग तक्रारींचा शोध घेतला, त्यात वर्ध्यामधील पोलीस स्टेशनमध्ये 2010 साली करण्यात आलेली ईशाची तक्रार सापडली. यानंतर वर्धा पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी समन्वय साधून तब्बल 15 वर्षांनंतर हरवलेलया चेहऱ्यावर मुस्कान आणण्याचा प्रयत्न केला, आणि अखेर अनिकेतला आपली बहीण मिळाली.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
January 22, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
15 वर्षांनंतर ईशाच्या चेहऱ्यावर 'मुस्कान', वर्ध्यातून गायब झालेली मुलगी हरियाणामध्ये कशी सापडली?