Jalna Tirupati Express: महाराष्ट्रातून तिरुपतीला धावणार विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Tirupati Express: महाराष्ट्रातून तिरुपतीला जाण्यासाठी विशेष रेल्वे धावणार आहे. जालना – तिरुपती एक्स्प्रेसचे वेळापत्रक आणि थांबे जाणून घेऊ.
जालना: मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजीचे सुलभ दर्शन व्हावे, यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष फेऱ्या चालवणार आहे. जालन्याहून तिरुपतीसाठी तब्बल 12 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 21 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान ही विशेष गाडी धावणार असून तिरुपती भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे याबाबत जाणून घेऊ.
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ‘ट्रेन ऑन डिमांड’ (टीओडी) योजनेअंतर्गत जालना – तिरुपती - तीरुचानुर (07601) आणि तीरुचानुर-तिरुपती-जालना (07602) या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या 12 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जालना आणि परिसरातील भाविकांना तिरुपती दर्शनासाठी आता अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनानुसार, गाडी क्रमांक 07601 (जालना-तिरुपती-तीरुचानुर) ही विशेष गाडी 21 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रत्येक रविवारी रात्री 7.20 वाजता जालना स्थानकातून सुटेल. ही गाडी परतूर, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी, बिदर, विकाराबाद, तुंटकळ, धर्मावरम, तिरुपती मार्गे सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता तीरुचानुर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07602 (तीरुचानुर-तिरुपती-जालना) ही विशेष सेवा 22 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रत्येक सोमवारी रात्री 10.30 वाजता तीरुचानुर येथून सुटून त्याच मार्गावर प्रवास करून मंगळवारी रात्री 9.30 वाजता जालना येथे परत येईल. या गाडीत 24 डबे असणार असून, त्यामध्ये वातानुकूलित, स्लीपर जनरल डब्यांचा समावेश असेल. ही गाडी डीओडी योजनेअंतर्गत 1.3 पट सामान्य भाड्याने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी या विशेष गाडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे
advertisement
जालना-परभणी नवीन शटल सेवा
दक्षिण मध्य रेल्वेने जालना आणि परभणी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन शटल सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. गाडी क्रमांक 07663 (परभणी-जालना) ही शटल सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी परभणी स्थानकातून सकाळी 7.10 वाजता सुटेल आणि सकाळी 9.30 वाजता जालना येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 07664 (जालना-परभणी) ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी 6.15 वाजता जालना स्थानकातून निघून रात्री 8 वाजता परभणी येथे पोहोचेल. रेल्वे प्रशासनाने ही सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने राबवली असून, नियमित प्रवाशांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Tirupati Express: महाराष्ट्रातून तिरुपतीला धावणार विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे